
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ghamasaan: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अरशद वारसी सध्या ‘Ghamasaan’मधील त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. विनोदी भूमिकांसाठी लोकप्रिय असलेल्या अरशद यांनी या चित्रपटात ‘महाराज’ ही गडद आणि दमदार व्यक्तिरेखा साकारली आहे. तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित हा चित्रपट सध्या ZEE5 वर स्ट्रीमिंग होत आहे.
‘Ghamasaan’ प्रेक्षकांना हिंदी सिनेमाच्या रांगड्या आणि ग्रामीण विश्वात घेऊन जातो. दोन वेगवेगळ्या विचारसरणींनी प्रेरित शक्तींमधील अथक पाठलाग या चित्रपटात पाहायला मिळतो. अरशद वारसी यांनी साकारलेला महाराज आणि प्रतीक गांधी यांनी साकारलेला आदित्य ही कथानकातील दोन प्रमुख पात्रं आहेत. आदित्य हा आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा निर्धार असलेला निर्भीड अधिकारी आहे.
‘Ghamasaan’मधील महाराजची व्यक्तिरेखा अरशद वारसी यांच्या नेहमीच्या पडद्यावरील प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अरशद यांनी या चित्रपटात अधिक गंभीर, गडद आणि दमदार व्यक्तिरेखा साकारली आहे.
महाराजची भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी अरशद यांना आपल्या लूकवरही विशेष मेहनत घ्यावी लागली. पात्राचं शारीरिक रूप, देहबोली आणि एकूण व्यक्तिमत्त्व पडद्यावर उठून दिसावं, यासाठी त्यांनी व्यक्तिरेखेच्या जगात स्वतःला झोकून दिलं.
महाराजच्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असलेल्या लूकबद्दल बोलताना अरशद वारसी म्हणाले, “मला वाटतं, महाराजची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला या व्यक्तीसारखं दिसणं गरजेचं होतं. आपण अभिनय करू शकतो, पण कुठेतरी योग्य कास्टिंग खूप महत्त्वाचं असतं.”
पुढे ते म्हणाले, “या व्यक्तिरेखेसाठी माझ्या डोक्यात एक विशिष्ट लूक होता आणि मला तो प्रत्यक्षात आणायचा होता. तो एका विशिष्ट पद्धतीने दिसायला हवा होता आणि मी ते कमी-अधिक प्रमाणात साध्य केलं आहे.”
महाराजच्या व्यक्तिरेखेबद्दल अरशद यांनी पुढे सांगितलं की, “मला माहीत होतं की मला ही व्यक्तिरेखा भारदस्त, थोडी जड दाखवायची होती. पण ते चांगलं होतं, मजा आली आणि लूकही छान दिसला.”
‘Ghamasaan’च्या माध्यमातून दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया हिंदी हार्टलँड कथानकाच्या विश्वात पुनरागमन करत आहेत. रॉ स्टोरीटेलिंग, गुंतागुंतीची पात्रं आणि थरारक मांजर-उंदराच्या खेळासारखा पाठलाग यामुळे हा चित्रपट वेगळा अनुभव देतो.
पारंपरिक नायक-खलनायकाच्या चौकटीपलीकडे जाणाऱ्या या कथेत अरशद वारसी आणि प्रतीक गांधी यांच्या व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत. अरशद यांचा महाराज हा त्यांच्या कारकिर्दीतील वेगळ्या छटांचा नमुना ठरला आहे.
‘Ghamasaan’ सध्या हिंदी भाषेत ZEE5 वर स्ट्रीमिंग होत आहे.