
Sunita Ahuja Get Emotional: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बॉलिवूडचा हिरो गोविंदा आणि त्याची बायको सुनीता आहुजा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. त्यांच्या 39 वर्षांच्या संसारात सगळं काही ठीक नाही, अशा चर्चा सुरू असतानाच दिवाळीआधी सुनीताने एक वक्तव्य केलंय. आणि त्यामुळे परत सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलंय.जुन्या दिवाळीच्या आठवणी सांगताना सुनीताने मनातली खंत बोलून दाखवली. पूर्वी दिवाळीत घर माणसांनी भरलेलं असायचं. नातेवाईक, मुलं सगळे असायचे. पण आता घरात पूर्वीसारखी लगबग राहिली नाही. सण आला तरी घर रिकामं रिकामं वाटतं, असं ती म्हणाली.Sunita Ahuja Get Emotional:
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सुनीताने दिवाळीच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, काळ बदलला तसं कुटुंबात पण खूप बदल झाले. पूर्वी सणाच्या दिवशी घरात सासू असायच्या, भाचे असायचे, मुलं असायची. घरात खूप उत्साह असायचा, आनंद असायचा. पण आता मुलं मोठी झालीत, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे. त्यामुळे दिवाळीत पूर्वीसारखी मजा आणि गजबज राहिली नाही.
आपल्या भावना सांगताना सुनीता म्हणाली, “पूर्वी दिवाळी आली की माझं घर माणसांनी भरलेलं असायचं. घरात सासू असायच्या, भाचे आणि मुलं असायची. खूप गजबज असायची. पण आता मुलं मोठी झाली आहेत आणि सासू पण नाहीत. त्यामुळे आता घर सुनंसुनं वाटतं.”
“मी मुलांना घरीच थांबा, असं सांगू शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यग्र आहे. आपण कोणाला त्रासही देऊ शकत नाही,” असंही ती म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “आता मी स्वतःच माझा आनंद शोधते. घरात दिवे लावते आणि मिठाई खाते. मला मधुमेह आहे, त्यामुळे विचार करूनच मिठाई खाते. पण तरीही मी माझी दिवाळी आनंदाने साजरी करते.”या सगळ्या बोलण्यात तिने गोविंदाचं नाव मात्र घेतलं नाही. त्यामुळे लोकांच्या भुवया अजूनच उंचावल्या.
गोविंदाला म्हणाली ‘कंजूस’याच मुलाखतीत सुनीताने सासरी साजरी केलेल्या पहिल्या दिवाळीची आठवण पण सांगितली. लग्नानंतर पहिल्या दिवाळीत तिच्या सासूने तिला छान साडी आणि सोन्याचा सेट भेट दिला होता. गोविंदाने पण तिला दिवाळीची भेट दिली होती.पण आता गोविंदा थोडा कंजूस झालाय, असं ती हसत हसत म्हणाली. सुनीता म्हणाली, “माझ्या सासूबाईंनी मला खूप छान साडी आणि सोन्याचा सेट भेट दिला होता. त्यांच्याकडून तर मी भेट घेतलीच, पण गोविंदाकडूनही भेट घेतली होती. आता गोविंदा थोडा कंजूस झाला आहे.”
“लग्नाला खूप वर्ष झाली ना! आता त्याने भेटवस्तू द्यायला हव्यात. घरच्या लक्ष्मीला भेट दिली तर घरात आणखी लक्ष्मी येते. त्यामुळे आपल्या घरच्या लक्ष्मीला भेट द्यायलाच हवी,” असं ती मिश्कीलपणे म्हणाली.
गोविंदा आणि सुनीताने 11 मे 1987 रोजी गुपचूप लग्न केलं होतं. लग्नानंतर जवळपास दोन वर्षांनी, 16 जुलै 1989 रोजी त्यांची मुलगी टीना आहुजाचा जन्म झाला. त्यानंतर गोविंदाने जगासमोर आपल्या लग्नाची माहिती दिली. पुढे 1 मार्च 1997 रोजी या दोघांच्या मुलाचा, यशवर्धन आहुजाचा जन्म झाला.
आता सुनीताच्या या वक्तव्यामुळे परत एकदा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झालीय. पण सुनीताचं बोलणं ऐकलं तर एक गोष्ट समजते, मुलं मोठी झाली की घर रिकामं वाटतं, ही भावना प्रत्येक आईचीच असते.