( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Hayden Panettiere Death: प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हेडन पॅनेटियर यांचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन झालं आहे. ‘Heroes’ आणि ‘Nashville’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या हेडन यांच्या निधनाची त्यांच्या प्रतिनिधींनी पुष्टी केली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
हेडन पॅनेटियर यांचा मृत्यू त्यांच्या ३७व्या वाढदिवसाच्या अवघ्या पाच दिवस आधी झाला. त्या २१ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करणार होत्या. मात्र, त्याआधीच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
हेडन यांच्या प्रतिनिधींनी अभिनेत्रीच्या निधनाची माहिती देताना दुःख व्यक्त केलं. “अत्यंत दुःखाने आम्ही आमच्या लाडक्या हेडनच्या दुःखद निधनाची घोषणा करत आहोत,” असं त्यांच्या प्रतिनिधींनी म्हटलं.
हेडन यांनी आपल्या अभिनयातून केवळ चाहत्यांचंच नव्हे, तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचंही मन जिंकलं होतं. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, सहकलाकार आणि चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
हेडन पॅनेटियर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘Heroes’ या सायन्स-फिक्शन ड्रामा मालिकेतील क्लेअर बेनेट ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘Nashville’ या म्युझिकल ड्रामामध्ये त्यांनी ज्युलिएट बार्न्सची भूमिका साकारली. २०१२ ते २०१८ या काळात त्या या मालिकेचा भाग होत्या.
हेडन पॅनेटियर यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘Remember the Titans’, ‘Raising Helen’, ‘Ice Princess’, ‘I Love You, Beth Cooper’, ‘Scream 4’ आणि ‘Scream 6’ यांचा त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत समावेश आहे. याशिवाय त्या ‘Amanda Knox’ या टेलिव्हिजन चित्रपटातही दिसल्या होत्या.
हेडन यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभवांवर आधारित ‘This Is Me – A Reckoning’ हे पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक यावर्षी मे महिन्यात प्रकाशित झालं. पुस्तकाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी बालपणापासून मनोरंजनविश्वातील आपल्या प्रदीर्घ प्रवासापर्यंत अनेक अनुभवांबद्दल भाष्य केलं होतं.
अवघ्या ३६व्या वर्षी हेडन पॅनेटियर यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अभिनयाच्या आठवणी आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.