(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Ishwar Thakur: टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता ईश्वर ठाकूर सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ‘FIR’ आणि ‘भाभी जी घर पर हैं!’ यांसारख्या लोकप्रिय विनोदी मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते ठाण्यातील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या पुढील उपचारांसाठी कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, ५४ वर्षीय ईश्वर ठाकूर यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक खालावली. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या बहिणीने सांगितले आहे. किडनीशी संबंधित गंभीर समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ईश्वर ठाकूर यांच्या आरोग्याच्या समस्या २०२० पासून सुरू झाल्याचे त्यांच्या बहिणी जयश्री यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. ईश्वर यांना मधुमेह असल्याने ही जखम व्यवस्थित बरी झाली नाही. त्यानंतर या जखमेची गुंतागुंत वाढत गेली आणि संसर्ग शरीरात पसरल्याचे जयश्री यांनी सांगितले.
जयश्री यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी ईश्वर यांची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
ईश्वर ठाकूर यांच्या उपचारांसाठी कुटुंबीयांनी आतापर्यंत आपली सर्व बचत खर्च केली आहे. मात्र, पुढील उपचारांचा खर्च परवडणे आता कुटुंबीयांसाठी कठीण जात आहे. त्यामुळे त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
जयश्री यांनी सांगितले की, “ईश्वर माझा मोठा भाऊ आहे. हे सगळं २०२० मध्ये, कोविड लॉकडाऊनच्या तीन महिने आधी, त्याच्या पायाला झालेल्या एका जखमेपासून सुरू झालं. त्याला मधुमेह आहे, त्यामुळे ती जखम बरी झाली नाही आणि आता संसर्ग त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “दोन-तीन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि आम्ही त्याला रुग्णालयात नेले. तेव्हापासून त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झालेली नाही. आम्ही आमच्याकडचे सर्व पैसे त्याच्या उपचारांवर खर्च केले आहेत, पण आता आम्हाला ते परवडत नाही. त्यामुळे आम्हाला मदतीची गरज आहे.”
याआधीही जाणवत होत्या आरोग्याच्या समस्या
ईश्वर ठाकूर यांना गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे जयश्री यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळातील आरोग्याच्या समस्यांचा परिणाम त्यांच्या यकृतावरही झाला होता. मात्र, त्यातून ते बरे झाल्याचे त्यांच्या बहिणीने स्पष्ट केले.
ईश्वर ठाकूर यांनी आपल्या विनोदी भूमिकांमधून हिंदी टेलिव्हिजनवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सध्याच्या प्रकृतीच्या वृत्तामुळे चाहत्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.






