
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Jhumka Patola Song: आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटातील नवं गाणं ‘झुमका पटोला’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नवरात्रीच्या उत्सवी वातावरणाची झलक दाखवणाऱ्या या गाण्यात शर्वरीच्या नृत्यकौशल्याची खास झलक पाहायला मिळते. गायिका श्रेया घोषालच्या सुरेल आवाजाने सजलेल्या या गाण्याला संगीतकार हिमेश रेशमिया यांचं संगीत लाभलं आहे.
शर्वरी वाघने आपल्या दमदार नृत्यशैलीने यापूर्वीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता ‘झुमका पटोला’ या नव्या गाण्यातून तिच्या नृत्याची आणखी एक झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या माध्यमातून तिला दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांमधील गाणी आणि त्यातून साकारलेले भावनिक क्षण प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. त्यांच्या मते, गाणं म्हणजे केवळ नृत्य किंवा मनोरंजन नसून ते चित्रपटातील व्यक्तिरेखेची भावना व्यक्त करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे.
‘झुमका पटोला’बद्दल काय म्हणाली शर्वरी?
या गाण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, “मला नेहमीच नृत्याची आवड होती; पण सूरज सरांसोबत काम करताना गाणं कथेमध्ये इतकं गुंफलेलं असतं की त्याकडे केवळ डान्स परफॉर्मन्स म्हणून पाहता येत नाही. ‘झुमका पटोला’च्या शूटिंगदरम्यान ते मला समजावून सांगायचे की तो क्षण माझ्या व्यक्तिरेखेसाठी नेमका काय अर्थ घेऊन येतो. त्यांनी यापूर्वी केलेल्या गाण्यांशी संबंधित किस्सेही ते सांगायचे. प्रत्येक स्टेप आणि हावभावातून ते व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला.”
पुढे ती म्हणाली, “नृत्याची स्वतःची एक भाषा असते आणि कधीकधी एखादं गाणं ते सांगून जातं, जे एखाद्या दृश्यातून व्यक्त करणं शक्य होत नाही. काही गाणी वर्षानुवर्षं आपल्या मनात का टिकून राहतात, यामागे एक कारण आहे. आपण लक्षात ठेवलेल्या व्यक्तिरेखा आणि क्षणांशी ती गाणी इतकी जोडली जातात की त्यांना एकमेकांपासून वेगळं करता येत नाही.”
‘झुमका पटोला’ या गाण्याने तिला नृत्यावरील प्रेम व्यक्त करण्याची एक वेगळी संधी दिल्याचंही शर्वरीने सांगितलं. “‘झुमका पटोला’ने मला नृत्यावरील माझं प्रेम अशा पद्धतीने व्यक्त करण्याची संधी दिली, जशी याआधी कधीच मिळाली नव्हती. ‘ये प्रेम मोल लिया’ या टायटल ट्रॅकला मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादानंतर आता प्रेक्षकांना हे गाणं अनुभवताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे,” असं ती म्हणाली.
श्रेया घोषालचा सुरेल आवाज, हिमेश रेशमियाचं संगीत
‘झुमका पटोला’ या गाण्याचे बोल सोनिया कपूर रेशमिया यांनी लिहिले आहेत, तर श्रेया घोषालने आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे. हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलेल्या या गाण्यात शर्वरीसोबत अभिनेत्री सौम्या टंडनही नृत्य करताना दिसते.
सूरज आर. बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात अनुपम खेर, सीमा पाहवा, सुप्रिया पाठक, स्वानंद किरकिरे आणि श्रुती सेठ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.