(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kantara Chapter 1: ऋषभ शेट्टीच्या बहुचर्चित ‘कंतारा’ चित्रपटाच्या प्रीक्वल ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महत्त्वाकांक्षी प्रीक्वल म्हणून सुरू झालेला हा प्रवास बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवत प्रेक्षकांच्या मनातही विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला. या खास टप्प्याचं औचित्य साधत निर्मात्या होम्बले फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जगभरातील प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कंतारा’नंतर त्याचा प्रीक्वल म्हणून ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका साकारली. रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात पाहायला मिळाल्या.
होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.
कदंब काळाची पार्श्वभूमी
‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’ची कथा प्राचीन कदंब काळातील, वसाहतवादी राजवटीपूर्वीच्या किनारी कर्नाटकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. पवित्र जंगलाची पौराणिक उत्पत्ती, मानवी लोभ आणि लोककथांमधील दैवी संदर्भ यांची सांगड चित्रपटाच्या कथेत घालण्यात आली आहे.
भावनिक कथानकासोबतच दमदार अॅक्शन आणि लोकसंस्कृतीशी जोडलेले घटक यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या संगीताचीही विशेष चर्चा झाली. बी. अजनीश लोकनाथ यांनी चित्रपटाचं संगीत दिलं आहे.
View this post on Instagram
अलीकडेच पार पडलेल्या SIIMA Awardsमध्ये ‘कंतारा’ने दमदार कामगिरी करत एकूण ९ पुरस्कार आपल्या नावावर केले. चित्रपटाच्या यशात त्याच्या कथा, अभिनय, संगीत आणि दिग्दर्शनाचा महत्त्वाचा वाटा असल्याचं पाहायला मिळालं.
होम्बले फिल्म्सने मानले प्रेक्षकांचे आभार
‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होम्बले फिल्म्सने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून जगभरातील प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल निर्मात्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रोडक्शन हाऊसने म्हटलं की, आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी जोडलेल्या या प्रवासाला जगभरातील प्रेक्षकांनी विशेष बनवलं असून, त्यांच्या प्रेमामुळे हा ‘कंतारा’च्या प्रवासातील अविस्मरणीय अध्याय ठरला आहे.
होम्बले फिल्म्सच्या आगामी प्रोजेक्ट्सची मोठी यादी
होम्बले फिल्म्सने आतापर्यंत ‘KGF’ फ्रँचायझी, ‘कंतारा’, ‘सालार’ फ्रँचायझी आणि ‘महावतार नरसिम्हा’ यांसारख्या पॅन-इंडिया प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे. प्रोडक्शन हाऊस आगामी काळातही मोठ्या प्रोजेक्ट्ससह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आगामी चित्रपटांच्या यादीत ‘सालार: भाग 2 – शौर्यंगा पर्व’, ‘महावतार परशुराम’, ‘सूर्या 48’, ‘येथो का नाय’ आणि ऋतिक रोशनसोबतचा आगामी प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.






