आगे आगे देखो, होता है क्या...; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा
बुधवारी बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी निवडीची घोषणा केली. सर्व २१ संचालक उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. या प्रक्रियेत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या राजकीय समन्वयाची चर्चा रंगली.
विशेष म्हणजे, अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना राष्ट्रवादी-शिंदेसेनेने केलेल्या एकजुटीमुळे भाजपला सत्तेच्या सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या आधीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घटनाक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा की पाच वर्षांचा, याबाबतही अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे सध्याची निवड म्हणजे सत्तेचा अंतिम निर्णय की भविष्यातील राजकीय संघर्षाची सुरुवात, याची उत्सुकता आहे.
विलासकाकांनी उभ्या केलेल्या सहकाराच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँकेचा कारभार पारदर्शक आणि सक्षम करण्यावर भर राहील. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी शुभेच्छा दिल्या असून सर्वांना सोबत घेऊन काम करू.
जिल्हा बँकेची आर्थिक सुदृढता टिकविणे, शेतकरी सभासदांचे हित जपणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देणे हे प्राधान्य असेल. सर्व घटकांना विश्वासात घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी काम करणार आहे.
जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, अशी अपेक्षा भाजपचा सदस्य म्हणून व्यक्त करण्यात गैर काही नाही. पक्षाच्या सदस्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो. त्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळाबाबतही मला माहिती नाही. जिल्हा बँकेची निवडणूक झाली म्हणजे सगळे संपले असे नाही. आगे आगे देखो, होता है क्या!असा सूचक इशारा त्यांनी दिला .






