( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
माधुरीची झलक असणारे खास प्रोमो नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘सोनी मराठी’ वाहिनीकडून लवकरच ‘कोण होणार करोडपती’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच माधुरीच्या या नव्या प्रोजेक्टसाठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वासाठी माधुरीची निवड करण्यात आली आहे. शोच्या पोस्टरमध्ये तिचा खास आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे. माधुरीच्या या नव्या भूमिकेमुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
माधुरीने सोशल मीडियावर शोचं पोस्टर शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. पोस्ट पाहिल्यानंतर तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही पत्नीचं कौतुक करत खास प्रतिक्रिया दिली.
Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा
माधुरीच्या पोस्टवर कमेंट करताना श्रीराम नेने यांनी “Right On! What a Perfect Fit” असं म्हटलं आहे. म्हणजेच, ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या भूमिकेसाठी माधुरी ही अगदी योग्य व्यक्ती असल्याचं त्यांनी या प्रतिक्रियेतून सूचित केलं आहे.
पतीकडून मिळालेल्या या कौतुकामुळे माधुरीच्या चाहत्यांचंही लक्ष वेधलं गेलं आहे. सोशल मीडियावर या कमेंटची चर्चा पाहायला मिळत आहे.
अभिनय आणि नृत्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर माधुरीने अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे. आता ती थेट क्विझ शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची सहजसुंदर शैली, संवाद साधण्याची पद्धत आणि प्रेक्षकांशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाला वेगळी रंगत मिळण्याची अपेक्षा आहे.
माधुरी या शोचं सूत्रसंचालन कशा पद्धतीने करते आणि स्पर्धकांसोबत तिची केमिस्ट्री कशी जमते, हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘कोण होणार करोडपती’बद्दल काय म्हणाली माधुरी?
दरम्यान, या नव्या प्रवासाबद्दल माधुरी दीक्षितनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. तिच्या मते, ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ एक कार्यक्रम नसून महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या आशा, स्वप्नं आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे.
अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा तिच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं माधुरीने सांगितलं. या मंचावर येणाऱ्या स्पर्धकांची जिद्द, त्यांचा संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची संधी मिळणार असल्याने ती या नव्या प्रवासासाठी उत्सुक असल्याचंही तिने म्हटलं आहे.
आता ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची अधिकृत रिलीज डेट कधी जाहीर होते आणि माधुरी आपल्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मनं जिंकते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






