
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Chikeezing Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यातच आता बालविश्वाची सफर घडवणारा आणि एका चिमुरड्याच्या स्वप्नपूर्तीची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा ‘चिकीझिंग’ हा आगामी मराठी चित्रपट चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या चित्रपटाचा आकर्षक ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘चिकीझिंग’चा ट्रेलर एका निसर्गरम्य डोंगराळ गावाच्या सुंदर दृश्यांनी सुरू होतो. त्यानंतर गावातील मोकळ्या वातावरणात धावणारा चिक्या, शाळेच्या गणवेशातील त्याचा वावर आणि त्याच्या अवखळ स्वभावाची झलक पाहायला मिळते. गलोलीने खेळणं, उलटं होऊन जगाकडे पाहण्याची गंमत, मित्रमैत्रिणींसोबतची धमाल अशा प्रसंगांतून चिक्याचं निरागस बालविश्व उलगडत जातं.
मात्र, ट्रेलरमध्ये पुढे एक वेगळंच भावविश्व पाहायला मिळतं. एका भव्य निवासी शाळेच्या प्रवेशद्वारापाशी उभा असलेला चिक्या आणि त्या शाळेच्या पलीकडील जगाकडे आशेने पाहणारा त्याचा चेहरा लक्ष वेधून घेतो. एका बाजूला साधं गावाकडचं घर, आईचं प्रेम आणि कष्टमय जीवन, तर दुसऱ्या बाजूला मनात असलेलं मोठं स्वप्न… या दोन विश्वांमधील अंतर कमी करण्यासाठी चिक्याची सुरू असलेली धडपड ट्रेलरमध्ये भावूक करणारी ठरते. परिस्थितीवर मात करून स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द या कथेतून दिसून येते.
जगभरातील १६ प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवड
‘चिकीझिंग’ या चित्रपटाची जगभरातील १६ प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. रिव्हरसाइड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे. काही महोत्सवांमध्ये चित्रपटाला पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे.
दिग्दर्शकांनी व्यक्त केला विश्वास
चित्रपटाच्या ट्रेलरविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, “हा ट्रेलर म्हणजे केवळ चित्रपटाची झलक नसून, प्रत्येकाच्या मनात दडलेल्या बालपणाशी पुन्हा एकदा नातं जोडणारा भावनिक प्रवास आहे. चिक्याच्या निरागस स्वप्नांतून प्रत्येकाला स्वतःचं बालपण आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा पुन्हा अनुभवता येतील. हा चित्रपट सर्व वयोगटांतील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या मनालाही स्पर्श करेल, याची आम्हाला खात्री आहे.”
या चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बालकलाकार कृष्णराज वाईंगडे याने साकारलेला चिक्या ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधून घेतो.
दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शब्बीर साबुवाला, रचना वोरा, हृषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी हे सहनिर्माते आहेत. कथेची जबाबदारी राजेंद्र बगाटे यांनी, तर पटकथा आणि संवादलेखन वैभव कुलकर्णी यांनी सांभाळले आहे.
छायांकन प्रवीण सोनावणे यांनी केले असून, संगीत श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी दिले आहे. संकलन शेखर गुरव आणि एस. शंकर यांनी केले आहे. तर कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी सुरेश कुंभार यांनी पार पाडली आहे.
एकूणच, बालपणातील निरागसता, स्वप्नांची उंची आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द यांची सुंदर सांगड घालणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट लहान मुलांसह मोठ्यांनाही त्यांच्या बालपणाची आठवण करून देणार आहे. येत्या १९ नोव्हेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.