
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रभर चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणावर आता चित्रपटाची निर्मिती होत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘Maharashtra Epstein Files’ या नावाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातील मुख्य भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी याचे नाव चर्चेत आहे. या वृत्तामुळे इम्रानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ तसेच त्यांचे व्हिडिओ तयार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप आहे. विविध आमिषे दाखवून लाखो रुपयांची उकळपट्टी केल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘Maharashtra Epstein Files’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप सावंत करणार आहेत. चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी इम्रान हाश्मीशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, त्याने या चित्रपटात काम करण्यास संमती दिली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्याच्या सहभागाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. पोस्टरसोबत शेअर करण्यात आलेल्या मजकुरात “सगळं काही उघड होणार” असा दावा करण्यात आला आहे. तसेच हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांचीदेखील महत्त्वाची भूमिका असणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आपल्या भूमिकेबाबतची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो चर्चेचा विषय ठरला आहे.
अशोक खरात हे नाशिकमधील ज्योतिषी म्हणून ओळखले जातात. ‘कॅप्टन’ या नावानेही ते अनेकांमध्ये परिचित आहेत. एका 27 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सध्या त्यांच्यावरील विविध आरोपांची चौकशी सुरू असून, तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चित्रपटाच्या कथानकात या संपूर्ण प्रकरणातील घडामोडी आणि त्यामागील सत्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ‘Maharashtra Epstein Files’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.