
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kapus Konda Movie Teaser: मराठी अभिनेते सचिन सचिन पिळगांवकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मानवी नातेसंबंध, कुटुंब आणि भावभावनांची गुंफण असलेल्या ‘कापूसकोंडा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. सत्यघटनेवरून प्रेरित असलेली अत्यंत वेगळी कथा आणि दमदार स्टारकास्ट यामुळे या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला ‘कापूसकोंडा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि स्टोरीवाला फिल्म सादर करीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि.ने केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे.
सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन केले आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली असून, अभिजीत हेगडेपाटील यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
चित्रपटातील गाण्यांना गायक अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नव्या पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले हे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.
‘कापूसकोंडा’ची कथा अत्यंत वेगळी आणि रंजक असल्याचं टीझरवरून दिसून येतं. राजा, राणी आणि राजकुमारी असलेल्या एका ‘हॅपी गो लकी’ कुटुंबाची ही गोष्ट आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट म्हणून मिळालेला कुत्रा यांच्यातील नात्याभोवती चित्रपटाची कथा फिरते.
‘A Family Dog Film’ अशी टॅगलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे. तसेच ही कथा सत्यघटनेवरून प्रेरित असल्याचेही सांगण्यात आले आहे. एका कुत्र्यामुळे कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये कोणकोणत्या घडामोडी घडतात, त्यातून मानवी भावभावना आणि नात्यांचे विविध पैलू कसे समोर येतात, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
‘कापूसकोंडा’चे बरेचसे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आले आहे. कथानकाची गरज लक्षात घेऊन या गावाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण वातावरण आणि कुटुंबाच्या भावविश्वाला चित्रपटात विशेष महत्त्व मिळणार असल्याचे दिसते.
टीझरमुळे ‘कापूसकोंडा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. वेगळे कथानक, कौटुंबिक भावविश्व, प्राण्याशी असलेले नाते आणि अनुभवी कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरण्याची शक्यता आहे.
आता नात्यांचा ‘कापूसकोंडा’ मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २३ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे.