
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
lokshahir Vitthal Umap: काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनात घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व! आपल्या पहाडी आवाजाने आणि लोककलेवरील निष्ठेने त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले. त्यांच्या याच आठवणींना स्वरांमधून अभिवादन करण्यासाठी १६व्या स्मृतिदिनानिमित्त ‘लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह’ आयोजित करण्यात आला आहे.
हा संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृदगंध पुरस्कारां’चा वितरण सोहळा २६ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
लोककला, लोकसंगीत आणि सामाजिक जाणीव यांचा सुरेल संगम आपल्या कलाविष्कारातून घडवणाऱ्या विठ्ठल उमप यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या ज्येष्ठ शाहिराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून लोकपरंपरेला नवी ओळख दिली. आज ते प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांची गाणी आणि कलेचा वारसा रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे.
या समारोहाच्या माध्यमातून विठ्ठल उमप यांच्या कलात्मक योगदानाला अभिवादन करण्यासोबतच त्यांनी जपलेली लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘बाबांची आठवण माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग’
या सोहळ्याबद्दल बोलताना नंदेश उमप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “बाबांची आठवण माझ्यासाठी केवळ आठवण नाही, तर ती माझ्या आयुष्याचा आणि कलेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी आपल्या आवाजातून लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं, तो वारसा पुढे घेऊन जाणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज ते माझ्यासोबत नसले, तरी त्यांची गाणी, त्यांचे विचार आणि लोककलेवरचं त्यांचं प्रेम मला प्रत्येक पावलावर प्रेरणा देतं.”
पुढे ते म्हणाले, “विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या माध्यमातून बाबांना आदरांजली वाहताना मनात एकच भावना असते, त्यांनी जपलेली लोककला अशीच जिवंत राहावी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचावी. ‘मृदगंध पुरस्कारां’च्या माध्यमातून समाजासाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करता येतो, ही माझ्यासाठी बाबांच्या कार्याला पुढे नेण्याची एक भावनिक संधी आहे.”
२०१२ साली स्थापन झालेल्या विठ्ठल उमप फाऊंडेशनने आजवर अनेक गरजूंना मदतीचा आधार दिला आहे. लोककलेसोबतच समाजसेवेचा वारसा जपत नंदेश उमप यांनी लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे कार्य पुढे नेले आहे.
यापूर्वी ‘मृदगंध पुरस्कारां’ने पद्मश्री शाहीर साबळे, ना. धों. महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, सुबोध भावे, विक्रम गोखले, पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. निलेश साबळे, मधुमंगेश कर्णिक, प्रशांत दामले, प्राजक्ता कोळी, जयंत सावरकर, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री पद्मा कोल्हे, दिलीप प्रभावळकर, सुदेश भोसले, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी माटेगावकर, भीमराव पांचाळे, रिंकू राजगुरू यांच्यासह अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती जपत लोककलेचा सन्मान करणारा हा सोहळा यंदाही संगीत, संस्कृती आणि सामाजिक योगदानाचा सुरेल संगम ठरणार आहे.