
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Dia Mirza: महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून सध्या वाद रंगला आहे. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबईकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तिच्या या व्हिडीओवर भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या एक्स पेजवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलीट केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता दियानेही प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराची भर पडल्यास हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देण्यासाठी सेलिब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते.
या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडीओ महापालिकेच्या अधिकृत एक्स पेजवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये तिने मुंबईकरांना फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले होते.
‘दिवाळीचा उत्सव साजरा करताना पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींची काळजी घ्यायला हवी. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण आपल्या सगळ्यांसाठी हानीकारक आहे. दिवाळी आवाजांनी नाही, तर आनंदाने साजरी करा,’ असे आवाहन दियाने या व्हिडीओतून केले होते.
दिया मिर्झाच्या या व्हिडीओवर अमित साटम यांनी नाराजी व्यक्त केली. ‘दिवाळी कशी साजरी करायची, याचे धडे आम्हाला दिया मिर्झाने शिकवू नयेत. दिवाळी आणि आमची परंपरा ही आमच्या संस्कृतीत मुळापर्यंत रुजलेली आहे. आम्हाला कुणीही हे शिकवायला जाऊ नये,’ अशा शब्दांत त्यांनी आपला आक्षेप नोंदवला.
अमित साटम यांनी १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजल्यानंतर ही पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर या व्हिडीओवरून वाद अधिकच वाढला. अखेर मुंबई महापालिकेने आपल्या एक्स पेजवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवला. मात्र, अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केल्यामुळे तो सोशल मीडियावर अजूनही पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ डिलीट केल्यानंतर दियाची प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेने व्हिडीओ डिलीट केल्यानंतर दिया मिर्झानेही यावर प्रतिक्रिया दिली. या मोहिमेसाठी आपण कोणतेही पैसे घेतले नव्हते, असे तिने स्पष्ट केले. ‘भलाईचा जमाना राहिला नाही,’ अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळीच्या जनजागृती मोहिमेपासून सुरू झालेला हा वाद आता आणखी चर्चेत आला आहे.