
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Maharashtra Epstein Files: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात भोंदूबाबा, महिलांचे शोषण आणि राजकीय संबंधांबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आता ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा तिसरा टीझर प्रदर्शित झाला असून, अभिनेता सुबोध भावेच्या महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिरेखेचा लूकही समोर आला आहे. सत्तेचा गैरवापर, गुन्हेगारीचे जाळे आणि न्यायासाठीचा संघर्ष यांची झलक या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’च्या नव्या पोस्टरमध्ये सुबोध भावे एका वजनदार राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसत आहेत. पांढराशुभ्र कुर्ता, काळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट आणि चेहऱ्यावरील गंभीर भाव यांमुळे त्यांच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लूकमुळे चित्रपटातील राजकीय संघर्षाबाबत उत्सुकता वाढली आहे.
‘मंत्री असो की आमदार असो… जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही…’ हा सुबोध भावे यांच्या व्यक्तिरेखेचा संवाद लक्ष वेधून घेत आहे. सत्तेच्या प्रभावाखाली सत्य दडपण्याचा प्रयत्न आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा संघर्ष या कथानकाचा महत्त्वाचा भाग असणार असल्याचे यातून सूचित होते.
राजकारण, गुन्हेगारी आणि तपासाभोवती फिरणार कथानक
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटात राजकीय आणि सामाजिक विश्वातील कथित वादग्रस्त घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रहस्य आणि थराराची मांडणी करण्यात आली आहे. गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणा, सत्तेच्या बळावर सत्य दडपण्याचे प्रयत्न आणि न्यायासाठीचा संघर्ष यांची झलक चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
तपासाचे फलक, घटनास्थळाभोवती लावलेल्या पोलिसांच्या पिवळ्या पट्ट्या, पत्रकारांचे प्रश्न आणि विविध पात्रांच्या चेहऱ्यांवरील भीती व संशय यांमुळे चित्रपटातील गूढ वातावरण अधिक ठळक होतं. सुबोध भावे यांच्या व्यक्तिरेखेमागे नेमकं कोणतं राजकीय रहस्य दडलं आहे, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.
OTT Releases: ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी! हे चित्रपट-सीरिज होणार रिलीज
दीपाली सय्यद, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे यांच्याही भूमिका
या चित्रपटात सुबोध भावे यांच्यासोबत दीपाली सय्यद, उदय टिकेकर आणि अक्षय टंकसाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण आणि गुन्हेगारी विश्वातील गुंतागुंतीचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत, तर चित्रपटाची संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी स्वरूप सावंत यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण आकाश काकडे यांचे असून, कलादिग्दर्शन अक्षय आंबेकर यांनी केले आहे.
कोण आहेत चित्रपटाचे निर्माते?
आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या निर्मिती व्यवस्थापनात नेहा घोडके, सचिन घनवट आणि यश सणस यांच्यासह इतर तंत्रज्ञांनीही योगदान दिले आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या टीझरमधून समोर आलेला सुबोध भावे यांचा राजकीय लूक आणि चित्रपटातील रहस्यमय वातावरण यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.