
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Aamne Saamne Natak Controversy: मराठी रंगभूमीवर गाजत असलेले ‘आमने सामने’ या मराठी नाटकातील कलकरांचा वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेय अभिनेता रोहन गुजर आणि केतकी पालव या कलाकरांना तडकाफडकी नाटकातून काढल्याचा आरोप त्यांनी नाटकाच्या निर्मात्यांवर केला होता. आरोप केल्यानंतर निर्माते लिना भागवत आणि मंगेश कदम यांनी त्यांची बाजू मांडली. व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी रोहन आणि केतकी यांनी तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितल्याचा दावा केला. यावर आता पुन्हा एकदा रोहन आणि केतकीने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आमच्या बाजूने पूर्णविराम.. असं कॅप्शन देत त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिो पोस्ट केला आहे
नवा व्हिडिओ शेअर करत रोहन आणि केतकी म्हणाले, ”आम्ही आमच्या निर्मात्यांचा ( लीना भागवत,मंगेश कदम) व्हिडिओ पाहिला. आम्ही त्यांच्या व्हिडिओवरील कमेंट्स देखील वाचल्या, नाण्याची दुसरी बाजू देखील आम्ही ऐकली. पण ती बाजू मांडत असताना अनवधानाने, चुकुन, सोयीस्करित्या, मुद्दामून काही मुद्दे मांडले नाहीत. तेच मांडण्यासाठी आम्ही हा नवीन व्हिडिओ करत आहोत. या व्हिडिओनंतर आम्हालासुद्धा असा कोणताही व्हिडिओ करण्याची अजिबात इच्छा नाही. आमच्या निर्मात्यांनी तीन वेळ मानधनवाढ हे जितक्या ठामपणे सांगितले, तितक्या ठामपणे त्यांनी हे सांगितले नाही की आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ. आता असा समज झाला आहे की एका वर्षात आम्ही तीन वेळा पैसे वाढवून मागितले. तर तसं नाहीये,” असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ”आठ वर्षात तिसरी मानधनवाढ.. जर सरासरी काढायला गेलो तर अडीच – पावणे तीन वर्षांनंतर एक मानधनवाढ. पहिली मानधनवाढ आमची झाली ती चार वर्षांनंतर.. जी अत्यंत किरकोळ होती, हे स्वत: निर्मात्यांनी सुद्धा मान्य केलं. दुसरी मानधनवाढ झाली ती सहा वर्षांनी. त्यावेळी एकदा आमचं नाटक बंद पडलं, ते परत नव्याने सुरू देखील झालं. त्यानंतर हाऊसफुल प्रयोग चार एक महिने झाले आणि त्यानंतर आम्ही मानधन वाढीचा प्रस्ताव मांडला. सहा वर्षांनंतर सहा वर्षांच्या हिशोबाने जेवढी बेसिक मानधनवाढ आम्हाला मिळायला हवी, तो आकडा आम्ही त्यांच्यासमोर ठेवला, तो प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला. सगळे मेसेजेस आमच्याकडेही आहेत. ते व्हिडीओमध्ये म्हणाल्या की, त्यांच्या मागण्या आम्ही सहज मान्य केल्या, ते चुकीचं आहे.”
“त्यांचं एक वाक्य मी वाचून दाखवते.. निर्माता म्हणून मी स्वत: मुरड घालून मी ही वाढ करत आहे.. असो. मुरड घालून.. मनाविरुद्ध.. म्हणजे ही मानधनवाढसुद्धा त्यांनी मनापासून केलीच नव्हती. तिसरी मानधनवाढ बरोबर वर्षानंतर आम्ही आता करत होतो. या सात वर्षांनंतर आमचे निर्माते कधीच स्वत:हून येऊन बोलले नाहीत की, आपलं नाटक छान चाललंय, बुकिंग चांगलं होतंय, हाऊसफुल होतंय, तर आता आपण तुमचे पैसे वाढवुयात.. असं कधीही झालं नाही. मानधनवाढवून घेताना आम्ही त्यांना हेसुद्धा स्पष्ट केले की, जर नाटकाचं बुकिंग उतरलं, तर आम्ही पुन्हा कमी पाकिटात पुन्हा काम करायाला तयार होऊ. पण आम्हाला हे नाटक शेवटपर्यंत करायचं आहे.” असं रोहन आणि केतकी म्हणाले.
‘लॉकडाऊनमध्ये ५० टक्के मानधनालाही तयार झालो’
कोरोना लॉकडाऊनच्या काळात नाटकांसाठी ५० टक्के प्रेक्षकक्षमतेची मर्यादा असताना निर्मात्यांनी ५० टक्के मानधन देण्याचं सांगितलं होतं. त्यावेळी आपण लगेच तयार झालो होतो, असं रोहन आणि केतकी यांनी व्हिडीओत म्हटलं.
गेल्या सात वर्षांपासून नाटकासाठी एक टीम म्हणून प्रामाणिकपणे काम केल्यानंतर मानधनातील दीड हजार रुपयांच्या फरकामुळे आपल्याला रिप्लेस करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याच गोष्टीचा आपल्याला सर्वाधिक त्रास झाल्याचं रोहनने भावुक होत सांगितलं.
व्हिडीओच्या शेवटी केतकी पालवनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या लोकांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं, त्यांच्यासोबत नाटकाचे चांगले दिवस पाहिल्यानंतर आपल्याला अत्यंत वाईट पद्धतीने बाजूला करण्यात आल्याची खंत तिने व्यक्त केली.
रोहन गुजर आणि केतकी पालव यांच्या या नव्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका मांडली असून, कलाकार आणि प्रेक्षकांकडूनही त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.