
कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’
राजने आपल्या पोस्टमध्ये पत्नीला प्रसूतीदरम्यान असह्य वेदनांमधून जाताना पाहण्याचा अनुभव शब्दांत मांडला. आयुष्यात कधीही इतके हतबल वाटले नव्हते. आपल्या सर्वांत जवळच्या व्यक्तीला वेदना सहन करताना पाहूनही तिच्यासाठी काही करता येत नसल्याची भावना त्याने व्यक्त केली. ‘देवा, मला तिच्यासाठी काहीतरी करू दे. तिच्या जागी मी हे सगळं सहन करू शकलो असतो तर…’ असा विचार मनात येत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्या क्षणी प्रेम करणे आणि प्रेमासाठी वेदना सहन करणे यातील फरक जाणवल्याचेही राजने शेअर केलं.
स्त्रियांच्या सामर्थ्याविषयी बोलताना राजने आई होण्याच्या अनुभवाकडे लक्ष वेधले. एका स्त्रीला आई होताना पाहिल्याशिवाय तिच्या सामर्थ्याची खरी जाणीव होऊ शकते का? ज्या वेदनांसमोर आपण असहाय होतो, त्याच वेदनांना सामोरे जाण्याचे धैर्य स्त्री दाखवते आणि एका नव्या जीवाला जगात आणते, असे त्याने म्हटले. पत्नीच्या वेदना वाटून घेऊ शकलो नाही, पण त्या अनुभवाने माझ्यातील माणूस बदलून टाकला, असेही त्याने भावुकपणे लिहिले. पत्नीबद्दलचे प्रेम आणि आदर अनेक पटींनी वाढल्याचे सांगत तिच्या आईपणासमोर नतमस्तक झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
बाबा झाल्यानंतर राजने आपल्या मुलीसाठी एक खास वचन दिले आहे. आपल्या मुलीला स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणाशीही संघर्ष करावा लागू नये, असे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन, असे त्याने म्हटले.
मुलीला ती कोणापेक्षाही कमी नाही, तिच्या स्वातंत्र्याला आणि आवाजाला स्वतःचे महत्त्व आहे, याची जाणीव करून देईन, असेही त्याने स्पष्ट केले. स्त्रियांना समानतेसाठी लढावे लागण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्याने आपल्या पोस्टमधून व्यक्त केली.
राजच्या या पोस्टमध्ये केवळ वडील झाल्याचा आनंद नाही, तर एका नव्या अनुभवातून स्वतःच्या विचारांमध्ये झालेल्या बदलाची जाणीवही दिसून येते. मुलीच्या जन्मामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नव्याने बदलल्याचे त्याने सांगितले. राज हंचनाळेच्या या भावुक पोस्टमधून पितृत्वाचा आनंद, पत्नीबद्दलचे प्रेम आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठीची त्याची इच्छा व्यक्त झाली आहे.