
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ranbir Kapoor: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच रणबीर कपूर अभिनेत्री साई पल्लवी आणि अभिनेता रवी दुबे यांच्यासोबत ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी रणबीरने महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहा कपूर यांच्याबद्दल अनेक खास गोष्टी सांगितल्या. त्याने केलेल्या एका खुलाशाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर रणबीर कपूरने मुलगी राहाच्या एका खास सवयीबद्दल सांगितले. रणबीर म्हणाला, “माझ्या मुलीचा जन्म झाल्यापासून असा एकही दिवस गेलेला नाही, ज्या दिवशी आम्ही सकाळी तुम्ही गायलेली हनुमान चालीसा ऐकली नसेल.”
रणबीरचे हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांनीही आनंद व्यक्त केला. त्यांनी प्रेमाने ‘व्वा, काय छान गोष्ट आहे!’ अशी प्रतिक्रिया दिली. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हनुमान चालीसा रणबीर आणि आलिया आपल्या मुलीला ऐकवतात, हे ऐकून हा खास किस्सा चर्चेत आला आहे.
आलियासोबतच्या नात्याबद्दलही केला खुलासा
या कार्यक्रमात रणबीरने पत्नी आलिया भट्टसोबतच्या नात्याबद्दलही भाष्य केले. त्याच्या मते, त्यांच्या नात्याचा पाया मैत्री आहे. प्रेम नात्याला जोडून ठेवते, विश्वास नात्याला मजबूत बनवतो आणि एकमेकांबद्दलचा आदर नातं टिकवून ठेवतो, असे रणबीरने सांगितले.
रणबीर आणि आलिया यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील घरी एका खासगी समारंभात लग्न केले. त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या मुलगी राहाचा जन्म झाला. दोघेही अनेकदा आपल्या मुलीबद्दलच्या खास गोष्टी सांगताना दिसतात.
दरम्यान, रणबीर कपूर सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या दोन भागांच्या चित्रपटात रणबीर प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘रामायण: पार्ट वन’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रणबीरच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.