
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Yeh Prem Mol Liya: दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, रोषणाई, फराळ आणि कुटुंबासोबतचा आनंद हे सगळं आलंच! याच दिवाळीच्या तयारीतील गोड क्षणांना सूरज आर. बडजात्या यांच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटातून उजाळा मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघा एक महिना शिल्लक असताना, आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या माध्यमातून दिवाळीच्या साफसफाईचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा खास संदेश समोर आला आहे.
दिवाळी जवळ आली की प्रत्येक घरात साफसफाईची लगबग सुरू होते. घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्यापासून ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी घर सजवण्यापर्यंत अनेक कामं केली जातात. या धावपळीत संपूर्ण कुटुंब सहभागी झालं, तर कामाचा ताण कमी होतो आणि एकत्र वेळ घालवण्याची संधीही मिळते.
घरातील एखादा कोपरा स्वच्छ करण्यावरून होणाऱ्या गमतीजमती, प्रत्येकाने आपापली मतं मांडणं आणि काही जणांनी कामातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणं, हे प्रसंग प्रत्येक भारतीय कुटुंबाला आपलेसे वाटतात. ‘ये प्रेम मोल लिया’मधूनही अशाच कौटुंबिक क्षणांचा अनुभव घेता येणार आहे. घराची साफसफाई हे केवळ काम नसून, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी आहे, हा संदेश या चित्रपटातून अधोरेखित होतो.
सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांतून पुन्हा अनुभवायला मिळणार कौटुंबिक जिव्हाळा
सूरज आर. बडजात्या यांच्या चित्रपटांमध्ये कुटुंब आणि नातेसंबंधांना नेहमीच महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. ‘हम आपके हैं कौन..’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, आपुलकी आणि एकत्रित आनंद सुंदरपणे मांडला आहे.
‘ये प्रेम मोल लिया’मधूनही याच भावविश्वाची झलक पाहायला मिळणार आहे. सणाचा आनंद केवळ उत्सव साजरा करण्यात नसतो, तर त्याच्या तयारीत कुटुंबातील प्रत्येकाने सहभागी होण्यातही असतो, याची आठवण हा चित्रपट करून देतो.
या आगामी कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाला संगीतकार हिमेश रेशमिया यांच्या संगीताची जोड लाभली आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज आर. बडजात्या यांनी केलं आहे. राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना, दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा संदेश चित्रपटातून दिला जात आहे