
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका महत्त्वाच्या भावनिक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे महिषासुर आणि असुरमाता दिती यांची कारस्थानं वाढत असताना, दुसरीकडे तुळजाई आणि महादेव यांच्या नात्याची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. आगामी भागात या दोघांची एक अद्भुत आणि भावनिक भेट पाहायला मिळणार असून, या प्रसंगामुळे मालिकेच्या कथानकाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
गावात ‘महादू’च्या रूपात वावरणारे महादेव हेच असल्याचं गुपित आता तुळजाच्या लक्षात आलं आहे. आजवर महादेवांनी आपली ओळख लपवून तिला अप्रत्यक्षपणे मदत केली. त्यामुळे आता या लपंडावाची गोड परतफेड करण्यासाठी तुळजाईनेही एक अनोखी युक्ती आखली आहे. त्यानुसार, एका निर्जन माळरानावर महादेवांना सोनेरी स्पार्कलने चमकणारं मायावी पान सापडतं आणि तिथूनच या रहस्यमय खेळाला सुरुवात होते.
धबधब्याजवळ घडणार तुळजाई-महादेवांची भावनिक भेट
पैंजणांचा नाद, हवेत उडणारी रंगीत फुलपाखरं आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव अशा जादुई वातावरणात महादेव एका अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करत एका भव्य धबधब्यापाशी पोहोचतात. तिथे गावकऱ्याच्या वेशात उभी असलेली तुळजाई त्यांच्यासमोर येते. या क्षणी निसर्गही जणू स्तब्ध झाल्याचा भास निर्माण होतो. दोघांमध्ये शब्दांविना एक हळवा आणि भावनिक संवाद घडतो. हा देखणा प्रसंग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
एका बाजूला तुळजाई आणि महादेव यांच्या भेटीचा भावनिक प्रसंग उलगडत असताना, दुसरीकडे महिषासुर आणि असुरमाता दिती तुळजाईची शक्ती आणि तिच्या भक्तांची श्रद्धा मोडून काढण्यासाठी नवनवीन डाव आखत आहेत. त्यामुळे या महाभेटीचा पुढील कथानकावर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या भेटीनंतर नियती आणि कर्तव्याच्या बंधनात अडकलेले महादेव आणि तुळजाई एकत्र येणार का? की त्यांच्या नात्यात नवा दुरावा निर्माण होणार? शिवाय, महादेवांच्या कुटीत घडणाऱ्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे त्यांच्या मानवी रूपातील नात्याची कसोटी लागणार आहे. या सर्व घडामोडींमुळे मालिकेतील पुढील भाग रंजक ठरणार आहेत. ‘आई तुळजाभवानी’ मालिका दररोज रात्री ८.५० वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल. तसेच, प्रेक्षकांना ही मालिका जिओहॉटस्टारवर कधीही आणि कुठेही पाहता येणार आहे.