
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Aishwarya Narkar Serial: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही मालिका अवघ्या चार महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मालिकेने १०० भागांचा टप्पाही पूर्ण केला नसताना ती बंद होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मालिकेचा अंतिम भाग कधी प्रसारित होणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांचे भवितव्य अनेकदा टीआरपी आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. अपेक्षित लोकप्रियता न मिळाल्यास मालिकांच्या वेळेत बदल केला जातो, तर काही मालिका थेट बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’च्या ऑफ एअर होण्याच्या चर्चेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
ऐश्वर्या नारकर टेलिव्हिजनवर कमबॅक करणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना या मालिकेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. ही मालिका १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुरुवातीला सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या वेळेत अलीकडेच बदल करण्यात आला. त्यानंतर मालिकेला दुपारचा स्लॉट देण्यात आला होता.
वेळ बदलल्यानंतर आता मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. मालिकेने अद्याप १०० भाग पूर्ण केले नसल्याने अवघ्या चार महिन्यांत ती संपणार असल्याच्या चर्चेमुळे चाहतेही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार, ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ मालिकेचा अंतिम भाग २१ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार असल्याची चर्चा आहे. तसेच ही मालिका बंद झाल्यानंतर दुपारी १ वाजताच्या स्लॉटमध्ये ‘विसरू नको तू मला’ ही मालिका प्रसारित केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे.
मात्र, मालिकेच्या शेवटाबाबत किंवा अंतिम भागाच्या तारखेबाबत स्टार प्रवाह वाहिनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे सध्या या मालिकेच्या ऑफ एअर होण्याच्या चर्चांना जोर आला असून, वाहिनीच्या अधिकृत घोषणेनंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.