
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi Awards 2026: झी मराठी अवॉर्ड्स २०२६ लवकरच पार पडणार आहे. यावेळी मालिकांमधील खलनायकी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे कलाकार आता एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहेत. ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ मध्ये खलनायकांच्या खास परफॉर्मन्सची रंगत अनुभवायला मिळणार आहे. या परफॉर्मन्समध्ये प्रत्येक पात्राची खासियत आणि ताकद एका अनोख्या रूपातून सादर केली जाणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक खलनायकाला एका विशिष्ट प्राण्याची शक्ती देण्यात आली आहे. या संकल्पनेतून खलनायकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत.
या खास परफॉर्मन्समध्ये ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील इंदुराणी, ‘दीपज्योती’ मालिकेतील प्रीती, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील भैरवी आणि ‘कमळी’ मालिकेतील अनिका सहभागी होणार आहेत. या कलाकारांचा दमदार अंदाज आणि नृत्याची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारणाऱ्या मेघन जाधवसाठी हा परफॉर्मन्स एक वेगळाच अनुभव ठरला. या सादरीकरणात त्याला व्हॅम्पायरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र, प्रेक्षकांसमोर नृत्य करण्याचा अनुभव नवीन असल्याने तो सुरुवातीला थोडा घाबरला होता.
या अनुभवाबद्दल बोलताना मेघन जाधव म्हणाला, “हा परफॉर्मन्स माझ्यासाठी एकदम वेगळा अनुभव होता! मी याआधी कधीही असं काही केलं नव्हतं. आमच्या कोरिओग्राफरनी हा परफॉर्मन्स खूप छान पद्धतीने तयार केला. त्यांनी मला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायरची भूमिका साकारणार आहे.”
या भूमिकेबद्दल समजल्यानंतर त्याच्या जवळच्या व्यक्तीलाही उत्सुकता वाटल्याचा किस्सा त्याने सांगितला. तो म्हणाला, “अनुष्काला ‘व्हॅम्पायर डायरीज’ ही मालिका खूप आवडते. जेव्हा मी तिला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायर बनणार आहे, तेव्हा ती माझ्यापेक्षाही जास्त उत्सुक झाली होती.”
पहिल्याच टेकमध्ये परफॉर्मन्स पूर्ण; कलाकारांनी वाजवल्या टाळ्या
नृत्याचा सराव केला असला, तरी प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी मेघनवर जबाबदारीचं दडपण होतं. प्रेक्षकांसमोर नृत्य करणं त्याच्यासाठी नवीन होतं. त्यामुळे काही रात्री झोपेशिवाय गेल्याचंही त्याने सांगितलं. तांत्रिक आणि वेळापत्रकाच्या अडचणींमुळे हा परफॉर्मन्स आधीच शूट करावा लागला.
मेघनने सांगितलं, “रात्रभर शूटिंग करूनही, फक्त तीन तासांची झोप घेऊन मी परफॉर्मन्ससाठी आलो. माझं संपूर्ण लक्ष परफॉर्मन्सवर होतं. शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच टेकमध्ये परफॉर्मन्स पूर्ण झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता.”
आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन केल्याचा आनंद त्याला आहे. देवाच्या कृपेने हा परफॉर्मन्स छान जमल्याचं सांगत, तो टीव्हीवर कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता असल्याचंही मेघनने व्यक्त केलं.
‘मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच हे स्वप्न सत्यात उतरलं!’ – साक्षी गांधी
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत इंदुराणीची भूमिका साकारणारी साक्षी गांधी हिच्यासाठीही यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा खास आहे. लहानपणापासून झी मराठी पाहणाऱ्या साक्षीला एक दिवस याच वाहिनीवर मुख्य खलनायिकेची भूमिका साकारायला मिळेल, असं कधी वाटलं नव्हतं.
आपल्या भावना व्यक्त करताना साक्षी गांधी म्हणाली, “मी लहानपणापासून झी मराठी बघत आले आहे. कधी वाटलंही नव्हतं की, आपण एखादी मालिका करू. याआधी मी झी मराठीवर कॅमिओ केला आहे. पण यावर्षी मी झी मराठीवर मुख्य खलनायिकेची भूमिका साकारतेय. बऱ्याचदा हे सगळं स्वप्नवत वाटतं. पण हे सगळं मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्यासोबत असतं.”
यंदा पहिल्यांदाच झी मराठी अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्याचा आनंदही साक्षीने व्यक्त केला. या सोहळ्यात तिचा डान्स परफॉर्मन्सही असणार आहे. सर्व कलाकार एकत्र येतात, भेटीगाठी होतात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र आल्यासारखं वातावरण निर्माण होतं, असं तिने सांगितलं. पुरस्कार कोणाला मिळणार, याची उत्सुकता आणि कलाकारांची धमाल यामुळे हा सोहळा अधिक खास बनतो, असंही साक्षी म्हणाली.
खलनायकांचा अनोखा अंदाज, दमदार नृत्य आणि कलाकारांची धमाल यामुळे यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मधील हा परफॉर्मन्स खास आकर्षण ठरणार आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा शनिवार, ३१ ऑक्टोबर आणि रविवार, १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता, फक्त झी मराठीवर पाहता येणार आहे.