
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Suraj Chavan: सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने चाहत्यांसोबत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. काही महिन्यांपूर्वी बाबा झालेल्या सूरजने पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. यंदा त्याच्या लेकीची पहिली दिवाळी असल्याने त्याने खास पद्धतीने कन्या पूजन केलं. सूरजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माझ्या लाडाच्या लक्ष्मीचे लक्ष्मी पूजन, माझ्या दोन लक्ष्मी’ असं खास कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओमध्ये सूरजची पत्नी संजना आपल्या चिमुकल्या लेकीला घेऊन पाटावर बसलेली दिसत आहे. तर सूरज आपल्या लेकीची पूजा करताना दिसतोय. यावेळी त्याने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीचं कन्या पूजन केलं.
विशेष म्हणजे, सूरजने केवळ लेकीचेच नाही, तर पत्नी संजनाचेही पाय धुऊन तिची पूजा केली. त्यानंतर दोघींनाही ओवाळलं. इतकंच नाही, तर सूरज पत्नीच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घेतानाही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज आणि त्याची चिमुकली लेक खूपच गोड दिसत आहेत. पहिल्यांदाच लेकीचा चेहरा पाहायला मिळाल्याने चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
जान्हवी किल्लेकरची खास कमेंट
सूरजने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी त्याच्या लेकीचं कौतुक करत तिला आशीर्वाद दिले आहेत. सूरजची मानलेली बहीण आणि मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनेही या पोस्टवर खास कमेंट केली आहे. ‘आमची लक्ष्मी’ असं म्हणत तिने सूरजच्या लेकीवर प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सूरज चव्हाण २०२४ मध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याने संजनासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांनी या जोडप्याने आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अखेर ४ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले. आता लेकीच्या पहिल्या दिवाळीनिमित्त सूरजने केलेल्या या खास पूजनाचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.