
फोटो सौजन्य - Social Media
ती म्हणाली, “मी या देशाची नागरिक आहे. देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा थेट परिणाम माझ्यावर होतो आणि माझ्या कृतींचाही परिणाम देशावर होत असतो. त्यामुळे माझी जबाबदारी मी गांभीर्याने घेते. भारताच्या विकासासाठी शक्य ते योगदान देत राहीन.” यावेळी भूमीने महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगताना ती म्हणाली, “निम्म्या लोकसंख्येला मागे ठेवून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.” महिलांना समान संधी आणि सक्षम वातावरण मिळाल्याशिवाय देशाची आर्थिक प्रगती अपेक्षित वेगाने होणार नाही, असे तिने नमूद केले.
भारत वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, पुढील २१ वर्षांत मल्टी-ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याची मोठी संधी देशासमोर असल्याचे भूमीने सांगितले. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निर्णयप्रक्रियेत समान संधी देणे अत्यंत गरजेचे असल्याचे ती म्हणाली. महिलांचा सहभाग हा केवळ सन्मानाचा विषय नसून देशाच्या आर्थिक विकासासाठीही आवश्यक असल्याचे भूमीने स्पष्ट केले. महिलांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या तरच त्या मोठ्या प्रमाणात कामगार शक्तीचा भाग बनू शकतील. त्यामुळे आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांचा परस्परांशी थेट संबंध असल्याचेही तिने अधोरेखित केले.
आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बदल या विषयांवरही भूमीने आपली भूमिका मांडली. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ती म्हणाली. विकसित भारताचे स्वप्न केवळ सरकार किंवा काही मोजक्या व्यक्तींमुळे पूर्ण होणार नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातूनच ते साकार होईल, असेही तिने नमूद केले. ‘नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये भूमी पेडणेकरने देशाप्रती जबाबदारी, महिला सक्षमीकरण, आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट भूमिका मांडली. तिच्या विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.