
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलताना दिसते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेला एक विचित्र अनुभव सांगितला आहे. एका सीनसाठी ब्रा न घालता शर्टची बटणं उघडी ठेवण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली होती, असा खुलासा राधिकाने केला. एवढंच नव्हे, तर कलाकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या इंटीमसी कोऑर्डिनेटर्सनाही निर्मात्यांच्या दबावामुळे कामावरून काढण्यात आल्याचं तिने सांगितलं.
न्यूज १८शी बोलताना राधिकाने ॲक्शन चित्रपटाच्या सेटवरील प्रसंग सांगितला. तिच्या म्हणण्यानुसार, तिला “ब्रा न घालता फक्त शर्ट घालून त्याची बटणं उघडी ठेवून ॲक्शन सीन करू शकतेस का?” अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला तिने विरोध केल्यानंतरही अंतर्वस्त्रांमध्ये सीन करण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचं तिने सांगितलं.
ॲक्शन सीनमध्ये अभिनेत्रीने प्रेक्षकांना आकर्षित करावं किंवा उत्तेजित करावं, अशी अपेक्षा ठेवली जाते, या मुद्द्यावरही राधिकाने आपलं मत मांडलं. तिच्या मते, एखादी भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्या पात्राबद्दल आणि त्याच्या चित्रणाबद्दल स्पष्ट माहिती मिळणं आवश्यक आहे.
‘सीनच्या दोन दिवस आधी वेगळंच सांगू नका’
राधिका म्हणाली की, एखाद्या पात्राला चित्रपटात विशिष्ट प्रकारे दाखवण्याचा निर्णय असेल, तर तो सुरुवातीलाच स्पष्ट केला पाहिजे. त्यानंतर भूमिका स्वीकारायची की नाही, हे ठरवण्याचा निर्णय अभिनेत्रीकडे असायला हवा.
मात्र, शूटिंगच्या अगदी दोन दिवस आधी वेगळ्याच प्रकारच्या दृश्याची मागणी केली जाते आणि त्यासाठी कपड्यांबाबत दबाव आणला जातो, तेव्हा हा अनुभव त्रासदायक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारा ठरतो, असं तिने स्पष्ट केलं. ऐनवेळी अशा मागण्या करण्याऐवजी सुरुवातीलाच भूमिका आणि दृश्यांबद्दल स्पष्टता असावी, असं तिचं म्हणणं आहे.
चित्रपटांच्या सेटवर इंटिमेट किंवा न्यूडिटी असलेल्या दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांच्या मर्यादा आणि संमतीचा आदर राखला जावा, यासाठी इंटीमसी कोऑर्डिनेटर्स काम करतात. मात्र, त्यांचं अस्तित्व असूनही कलाकारांवरील दबाव पूर्णपणे संपलेला नाही, असं राधिकाने सांगितलं.
तिच्या म्हणण्यानुसार, इंटीमसी कोऑर्डिनेटर्सनी कलाकारांची बाजू घेतली किंवा निर्मात्यांच्या मागण्यांना विरोध केला, तर त्यांना कामावरून काढून टाकलं जाऊ शकतं. काही वेळा त्यांनाही निर्मात्यांच्या सूचनांनुसार काम करावं लागतं. त्यामुळे या व्यवस्थेमुळे बदल झाला असला, तरी कलाकार पूर्णपणे सुरक्षित झाले आहेत, असं म्हणता येणार नाही, असं मत तिने व्यक्त केलं.
राधिका आपटेच्या या वक्तव्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांची संमती, चित्रीकरणापूर्वी दृश्यांबाबत स्पष्टता आणि सेटवरील सुरक्षित वातावरण या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.