
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana Box Office Collection: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, दिवसेंदिवस चित्रपटगृहांमधील गर्दी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ‘रामायण’ने अवघ्या आठ दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांचा जादुई टप्पा पार केला आहे. या कमाईसह चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस विक्रमांना मागे टाकले आहे.
रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाने पहिल्या सात दिवसांत जगभरात ९४७ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. त्यानंतर आठव्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिवसअखेर चित्रपटाने जगभरातील कमाईचा १००० कोटी रुपयांचा आकडा पार केला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड चर्चेचा विषय ठरली आहे.
रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील पहिला १००० कोटींचा चित्रपट
या यशामुळे अभिनेता रणबीर कपूरच्या कारकिर्दीत एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. जगभरात १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणारा ‘रामायण’ हा रणबीरच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेचे आणि त्याच्या अभिनयाचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. साई पल्लवीसह इतर कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
४००० कोटींचे बजेट, दोन भागांत रंगणार रामायणाची कथा
‘रामायण’ हा चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांचे एकत्रित बजेट अंदाजे ४००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्सपैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.
सध्या ‘रामायण’चा पहिला भाग चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाला मिळणारा प्रतिसाद पाहता आता प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील भव्य दृश्ये, कलाकारांची फळी आणि कथेची मांडणी यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. आता आगामी काळात ‘रामायण’ बॉक्स ऑफिसवर आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.