
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Juhi Chawla Birthday: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि खळखळून हसण्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जुही चावला आज तिचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. . यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.
जुही चावलाचा जन्म हरियाणातील अंबाला येथे झाला. तिचे शिक्षण मुंबईत झाले. जुही अभ्यासात हुशार होती आणि परीक्षेची तयारीही ती मन लावून करायची. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने शिक्षण पूर्ण करून आयएएस अधिकारी व्हावे, तर आईला तिने खासगी क्षेत्रात करिअर करावे असे वाटत होते. मात्र, जुहीच्या मनात काहीतरी वेगळेच करण्याचे स्वप्न होते. अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाल्यास ती नक्कीच प्रयत्न करेल, असा तिचा विचार होता.
कॉलेजमध्ये असताना जुहीच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका स्पर्धेत तिने सहभाग घेतला आणि प्रथम क्रमांक पटकावला. त्याच काळात मिस इंडिया स्पर्धेसाठी अर्ज मागवले जात होते. जुहीच्या काही मैत्रिणींनी या स्पर्धेसाठी अर्ज भरले होते. त्यांना पाहून जुहीनेही अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, १९८४ मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत जुहीने विजेतेपद पटकावले. या यशामुळे तिच्यासाठी मनोरंजनविश्वाचे दरवाजे खुले झाले.
‘कयामत से कयामत तक’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण
मिस इंडिया झाल्यानंतर जुहीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात आमिर खानसोबत तिची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. पहिल्याच चित्रपटातून जुहीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
जुही चावला केवळ अभिनयापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने व्यवसायाच्या क्षेत्रातही मोठी झेप घेतली. जुही तिचा पती जय मेहता आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाची सहमालक आहे. याशिवाय ती रिअल इस्टेट क्षेत्रातही गुंतवणूक करते. शाहरुख खानसोबत तिची ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ आणि ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ या निर्मिती संस्थांशी भागीदारी राहिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुही चावलाची एकूण संपत्ती अंदाजे ७,७९० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक म्हणून चर्चेत असते. एकेकाळी आयएएस अधिकारी होण्याची अपेक्षा असलेल्या जुहीने स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला आणि आज मनोरंजनविश्वासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहे.