
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Rani Chatterjee Chhath Puja: भारतात विविध धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. प्रत्येक धर्माच्या परंपरांचा आदर करत अनेक जण वेगवेगळ्या धर्मांचे सणही मोठ्या उत्साहात साजरे करतात. दिवाळी, ईद, ख्रिसमस असो किंवा छठपूजा, अनेक ठिकाणी सर्व धर्मांचे लोक एकत्र येऊन हे सण साजरे करताना दिसतात. सध्या देशभरात छठपूजेचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मलेली ही अभिनेत्री दरवर्षी मोठ्या श्रद्धेने छठपूजा करते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून राणी चॅटर्जी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, राणी चॅटर्जीचं खरं नाव काय आहे आणि तिला हे नाव कसं मिळालं?
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असून तिचं मूळ नाव सबिहा असं आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत ती राणी चॅटर्जी या नावाने प्रसिद्ध झाली. विशेष म्हणजे, तिचं नाव बदलण्यामागेही एक रंजक किस्सा आहे.
राणी दहावीत शिकत असताना ‘ससुरा बड्डा पैसावाला’ या भोजपुरी चित्रपटाचं शूटिंग करत होती. या चित्रपटातील एका दृश्यात तिला मंदिरात जाऊन आपल्या पतीसाठी देवाकडे प्रार्थना करायची होती. मात्र, अभिनेत्री मुस्लिम असल्याचं पुजाऱ्याला समजल्यास शूटिंगमध्ये अडथळा येऊ शकतो, अशी भीती दिग्दर्शकाला वाटत होती.
त्यामुळे दिग्दर्शकाने सबिहाला कोणी नाव विचारल्यास ‘राणी’ असं सांगण्यास सांगितलं. चित्रपटातही तिचं नाव राणी असंच ठेवण्यात आलं. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिचं नाव विचारल्यावर निर्मात्यांनी घाईघाईने राणी या नावापुढे चॅटर्जी हे आडनाव जोडलं. अशा प्रकारे सबिहाची ओळख राणी चॅटर्जी म्हणून निर्माण झाली.
‘मी दरवर्षी छठी मातेचा आशीर्वाद घेते’
‘ससुरा बड्डा पैसावाला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि राणी चॅटर्जीला मोठी लोकप्रियता मिळाली. पुढे तिने भोजपुरी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एका मुलाखतीत राणीला तिच्या धर्माबद्दल आणि छठपूजा साजरी करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर तिने सांगितलं की, ती लहानपणापासूनच सर्व धर्मांचा आदर करते.
राणी म्हणाली, “मी लहानपणापासूनच सर्व धर्मांचा आदर करते. लोकांनी मला प्रार्थना करताना क्वचितच पाहिलं असेल; पण पूजा आणि विधी करताना पाहिलं आहे. मी दरवर्षी छठी मातेचा आशीर्वाद घेते.”
राणीने पुढे सांगितलं की, चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे तिचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. एक कलाकार म्हणून तिला विविध धर्मांचा आणि परंपरांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
ती म्हणाली, “कधी मी चित्रपटांमध्ये ख्रिश्चन महिलेची भूमिका साकारते, कधी काली मंदिरात तांडव नृत्य करते, तर कधी भगवान शिवाची स्तुतीगीते गाते. विविध धर्मांना जाणून घेणं म्हणजे भारताला समजून घेणं होय.”
राणी चॅटर्जीच्या या विचारांमधून विविध धर्म आणि संस्कृतींबद्दलचा तिचा आदर दिसून येतो. त्यामुळेच तिच्या छठपूजा साजरी करण्याच्या परंपरेची सध्या चर्चा होत आहे.