
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अश्लील डीपफेक फोटोंचे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे डीपफेक फोटो शेअर केल्याप्रकरणी तिने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली. मात्र, आरोपीला मुंबईत आणल्यानंतर न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले. एवढंच नाही, तर पोलिसांच्या अटक प्रक्रियेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाने तिचे अश्लील डीपफेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात असल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील एक व्यक्ती हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणात आर्यन दीपक जैन याची ओळख पटवली.
मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी दिल्लीतील शाहदरा परिसरात जगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आर्यनला अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणून वांद्रे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपीच्या तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सोनाक्षीचे डीपफेक फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त करायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
अटकेच्या प्रक्रियेवर न्यायालयाने उपस्थित केले प्रश्न
सुनावणीदरम्यान आर्यनच्या वकिलांनी पोलिसांच्या अटक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. पोलिसांनी आर्यनला आवश्यक नोटीस दिली नाही किंवा अटकेचे कारण योग्य प्रकारे स्पष्ट केले नाही, असा दावा बचाव पक्षाने केला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आर्यनला दिल्लीहून मुंबईत आणण्यापूर्वी तेथील जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले नव्हते, असाही आरोप वकिलांनी केला.
आर्यननेही न्यायालयात आपण निर्दोष असल्याचे सांगितले. आपण कोणतीही चुकीची कृती केलेली नाही आणि आपल्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा त्याने केला.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. आरोपीला थेट दिल्लीहून मुंबई न्यायालयात आणण्याऐवजी नियमानुसार आधी दिल्लीतील जवळच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे आवश्यक होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रक्रियेचे पालन न करण्यामागे पोलिसांना कोणतेही वैध कारण देता आले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
याशिवाय, या प्रकरणातील आरोप असलेल्या गुन्ह्यांसाठी कमाल सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. आवश्यक कायदेशीर प्रक्रियांचे पालन न करता केवळ तपासासाठी आरोपीला अटक करणे किंवा ताब्यात ठेवणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
अखेर या कारणांमुळे न्यायालयाने पोलिसांची तीन दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळून लावली आणि आर्यनच्या सुटकेचे आदेश दिले. त्यामुळे सोनाक्षी सिन्हाच्या डीपफेक फोटो प्रकरणात आता पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.