
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्याची लेक आणि अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा भाऊ शिवजीत घाटगे याचा भव्य विवाहसोहळा नुकताच जयपूरमधील चौमुन येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या लग्नाला बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळ्यात नवरदेवापेक्षाही त्याची बहीण सागरिका घाटगे आणि तिचा पती, माजी क्रिकेटपटू झहीर खान यांचीच अधिक चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सागरिका घाटगे आपल्या भावाची म्हणजेच शिवजीत घाटगे याची आरती करताना दिसत आहे. करवली म्हणून तिने पारंपरिक विधी पार पाडला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. सुंदर पारंपरिक साडी, दागिने आणि शाही अंदाजात सागरिका एखाद्या राणीसारखी दिसत होती. भावाच्या लग्नातील तिचा हा खास लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
गुलाबी फेट्यात झहीर खानचा राजेशाही थाट
सागरिकाप्रमाणेच तिचा पती आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान याचाही लूक सध्या चर्चेत आहे. मेहुण्याच्या लग्नासाठी झहीरने खास देसी अंदाज निवडला होता. त्याने काळ्या रंगाची बंदगला शेरवानी आणि पांढरा पायजमा परिधान केला होता. त्यावर डोक्यावर बांधलेल्या गुलाबी रंगाच्या फेट्यामुळे त्याचा लूक अधिकच खुलून दिसत होता. त्याचा हा साधा पण राजेशाही अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.
या लग्नसोहळ्यात सागरिका आणि झहीरचा मुलगा फतेहनीश यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेत हा छोटा नवाब खूपच गोंडस दिसत होता. आई-वडिलांसोबत त्यानेही लग्नसमारंभात हजेरी लावली. सागरिका, झहीर आणि त्यांचा मुलगा फतेहनीश यांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
एकीकडे भावाच्या लग्नात करवली म्हणून सागरिकाचा शाही थाट पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे झहीर खानच्या फेट्यातील देसी लूकची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवजीत घाटगे यांच्या लग्नसोहळ्यातील हे खास क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.