(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Chhaya Kadam: मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त निर्मितीत तयार झालेल्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटातील नंदा ही व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्याबद्दल त्यांना ब्रिक्स+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे छाया कदम यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे ब्रिक्स+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटाला विशेष कारणासाठी गौरवण्यात आले. “एका जिवंत राष्ट्रीय व्यक्तिरेखेची निर्मिती आणि विविध लोकांच्या संस्कृतींमधील एकतेची खोलवर रुजलेली तत्त्वे शोधण्याचा धाडसी प्रयत्न” अशा शब्दांत चित्रपटाच्या योगदानाची दखल घेण्यात आली. या चित्रपटातील नंदा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या छाया कदम यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक झाले.
संवेदनशील अभिनयाने छाया कदम यांनी जिंकली प्रेक्षकांची मने
छाया कदम या आपल्या सहजसुंदर, वास्तववादी आणि संवेदनशील अभिनयासाठी ओळखल्या जातात. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची वेगळी ओळख देण्याची त्यांची खासियत आहे. ‘स्नो फ्लॉवर’मधील नंदाच्या भूमिकेतूनही त्यांच्या अभिनयातील भावनिक खोली आणि व्यक्तिरेखेत सामावून जाण्याची क्षमता पुन्हा एकदा दिसून आली आहे.
ब्रिक्स+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला हा विशेष सन्मान छाया कदम यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडून त्यांच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याचे या पुरस्कारातून अधोरेखित झाले आहे. ‘स्नो फ्लॉवर’च्या माध्यमातून त्यांनी अर्थपूर्ण कथाकथन आणि प्रभावी व्यक्तिरेखा साकारण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
छाया कदम यांच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे चाहत्यांकडून आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याची अपेक्षा आहे.






