
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shraddha Kapoor Eetha Movie: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘ईठा’ सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनापासून प्रेरित असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्मात्यांनी त्यातील पहिले गाणे प्रदर्शित केले असून, या गाण्यात श्रद्धा कपूरचा खास मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. तिची अदाकारी आणि नृत्यकौशल्य पाहून चाहतेही भारावले आहेत.
‘ईठा’ चित्रपटातील ‘जी जी रं जी’ (Ji Ji Rr Ji) हे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून, अमिताभ भट्टाचार्य यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने आपल्या सुरेल आवाजात हे गाणे गायले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंट यांनी केले आहे. लावणीच्या ठेक्यासोबतच या गाण्यात भावनिक प्रसंगांचीही जोड पाहायला मिळते.
नऊवारी साडी, नथ अन् घुंगरू; श्रद्धाच्या अदाकारीवर चाहते फिदा
या गाण्यात श्रद्धा कपूरने नऊवारी साडी, नाकात नथ, हातात बाजूबंद, केसात गजरा आणि पायात घुंगरू असा खास मराठमोळा साज केला आहे. तिचा हा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे. पायात घुंगरू बांधून ती जेव्हा नृत्याला सुरुवात करते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि नृत्यातील उत्साह पाहण्यासारखा आहे. श्रद्धाने या गाण्यासाठी घेतलेली मेहनत तिच्या सादरीकरणातून स्पष्टपणे जाणवते. तिच्या नृत्यकौशल्याचे आणि अदाकारीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही झलक पाहायला मिळत आहे. ढोलकी वाजवतानाचा त्याचा अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या गाण्याला आणखी एक खास रंग चढला आहे.
या गाण्यातील प्रसंगही तितकाच भावनिक आहे. बाळंतपणानंतर लगेचच, स्वतःच्या जीवाला धोका असण्याची भीती आणि शारीरिक वेदना असूनही ‘ईठा’ मंचावर येते. मात्र, या सगळ्या वेदना बाजूला ठेवून ती इतक्या उत्साहाने नृत्य सादर करते की उपस्थित सर्वजण थक्क होतात. श्रद्धा कपूरने या प्रसंगात आपल्या अभिनयासोबतच नृत्यातूनही व्यक्तिरेखेतील जिद्द आणि भावनिक संघर्ष प्रभावीपणे दाखवला आहे.
दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. अजय-अतुल यांचे संगीत, श्रेया घोषालचा सुरेल आवाज आणि श्रद्धा कपूरचा लावणीतील ठसका यामुळे ‘जी जी रं जी’ हे गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता या चित्रपटातून श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा आणि संघर्षाचा प्रवास पडद्यावर कशा प्रकारे उलगडते, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.