(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sayonee Serial: टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाई तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रश्मी देसाई, जान्हवी सोनी आणि गौतम सिंह विग यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘सायोनी’ ही नवी मालिका आज, 23 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.
‘सायोनी’ची कथा सानवी या तरुणीभोवती फिरते. आईचं प्रेम मिळवण्यासाठी आसुसलेल्या सानवीच्या आयुष्यात आदित्यची एन्ट्री होते. मात्र, आदित्य हा तिच्यासाठी निर्णय घेणारा किंवा तिची प्रत्येक लढाई स्वतः लढणारा साथीदार नाही. उलट, तो सानवीला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं बळ देतो.
जान्हवी सोनी सानवीची भूमिका साकारत आहे, तर गौतम सिंह विग आदित्यच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दोघांची प्रेमकहाणी मालिकेत कशा पद्धतीने पुढे जाते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘सायोनी’मधून रश्मी देसाई माया या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. माया खंबीर, व्यवहारकुशल असून आपल्या भावना मनातच दडवून ठेवणारी स्त्री आहे. अनेक वर्षांनंतर रश्मीला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
सरगुन मेहता आणि रवी दुबे यांच्या ड्रीमियाता एंटरटेनमेंटची निर्मिती असलेली ‘सायोनी’ विश्वास, समानता आणि प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहे.
‘मायाची व्यक्तिरेखा माझ्यासाठी खास’ – रश्मी देसाई
मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रश्मी देसाईने सांगितलं की, माया ही केवळ एक व्यक्तिरेखा नसून आयुष्यातील वास्तव समजून घेणारी व्यवहारकुशल स्त्री आहे. गेल्या काही काळात तिला अनेक भूमिकांसाठी विचारणा झाली होती. मात्र, त्या कथा किंवा व्यक्तिरेखांशी तिचं नातं जुळलं नाही, त्यामुळे तिने त्या भूमिका स्वीकारल्या नाहीत.
रश्मीच्या म्हणण्यानुसार, तिला केवळ छोट्या पडद्यावर परतायचं नव्हतं, तर आपल्या कामामागे एक अर्थपूर्ण उद्देश असावा अशी तिची इच्छा होती. त्यामुळे योग्य संधीची वाट पाहिल्यानंतर तिने ‘सायोनी’मधील मायाची भूमिका स्वीकारली.
निर्माते सरगुन मेहता आणि रवी दुबे यांचं काम तसेच दिग्दर्शक उत्तम भेलावत यांच्या कामाचंही रश्मीने कौतुक केलं. योग्य संधीची वाट पाहिली आणि आपल्या भावनांशी प्रामाणिक राहिले, याचा आनंद असल्याचं तिने सांगितलं.
‘सानवीच्या चांगुलपणाला तिची कमजोरी समजू नये’
सानवीची भूमिका साकारणारी जान्हवी सोनी म्हणाली की, सानवी प्रेमळ असून सर्वांची काळजी घेणारी मुलगी आहे. मात्र, तिच्या चांगुलपणाला तिची कमजोरी समजू नये. तिला जे योग्य वाटतं, त्यासाठी ठामपणे उभं राहण्याचं धैर्य तिच्यात आहे.
रश्मी देसाईसोबत काम करण्याचा अनुभवही जान्हवीने सांगितला. रश्मी अतिशय प्रेमळ असून सहकलाकार म्हणून त्या नेहमीच मदत करतात, असं तिने म्हटलं. त्यामुळे रश्मीसोबत काम करण्याचा हा अनुभव आपल्यासाठी खास असल्याचं जान्हवीने सांगितलं.
आता ‘सायोनी’ मालिकेत सानवी, आदित्य आणि माया यांच्या आयुष्यात कोणती वळणं येतात आणि त्यांच्या नात्यांची गोष्ट कोणत्या दिशेने जाते, हे आजपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.






