
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Zee Marathi Serials: मनोरंजनाच्या दुनियेत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या झी मराठीवरील मालिकांमध्ये सध्या अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. कुठे नात्यांमध्ये नवे वळण येणार आहे, तर कुठे प्रेमाची नवी चाहूल लागणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’, ‘धाकट्या सुनेबाई’, ‘कृष्णाईच्या लेकी’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या मालिकांमध्ये या आठवड्यात महत्त्वाचे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. गुरुकुलला मिळणारी नवी जागा, आनंदीचा परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय, राधिका-वेदांतमधील जवळीक आणि तारिणीसमोर उभे राहणारे मोठे आव्हान यामुळे हा आठवडा प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. जाणून घेऊया, या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत बालदिनानिमित्त अबीर आणि ओवी गुरुकुलमधील मुलांसोबत आनंदाने हा दिवस साजरा करतात. याचदरम्यान सावली गुरुकुलसाठी नवीन जागा मिळवण्यात यशस्वी होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मात्र, नव्या जागेवरील गुरुकुलच्या पहिल्याच दिवशी वाडेकर मोठी खेळी खेळतात. गुरुकुलचा नवा मालक असल्याची घोषणा करून ते सर्वांनाच धक्का देतात. वाडेकरांच्या या निर्णयामुळे गुरुकुलसमोर आता कोणते नवे संकट उभे राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘लक्ष्मी निवास’मध्ये आनंदी घर सोडणार?
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नात्यांचे नवे पदर उलगडताना दिसणार आहेत. रमा पहिल्यांदाच सिद्धूला ‘बाबा’ म्हणून हाक मारते. दुसरीकडे, जयंत जान्हवीला न सांगता गुपचूप जानूला भेटायला जातो. पाडव्याला जान्हवी आणि भाऊबीजेला लक्ष्मी या दोघींकडून दिग्विजयचे औक्षण केले जाणार आहे.
याचदरम्यान आनंदी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करते. मात्र, सिद्धू आणि भावना तिच्या या निर्णयाला विरोध करतात. त्यामुळे नाराज झालेली आनंदी घर सोडून लक्ष्मीकडे राहायला जाते. तिच्या या निर्णयामुळे सिद्धू आणि भावना यांच्यात मोठे भांडण होणार आहे. आता आनंदीच्या निर्णयामुळे कुटुंबातील नात्यांमध्ये कोणते नवे वळण येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
‘धाकट्या सुनेबाई’मध्ये राधिका-वेदांतची जवळीक वाढणार
‘धाकट्या सुनेबाई’ मालिकेत पाणीदानाचा ट्रॅक सध्या महत्त्वाच्या वळणावर आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि टँकरवरून निर्माण झालेला वाद यामुळे गावातील वातावरण तापले आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान राधिका आणि वेदांत यांच्यातील प्रेमळ, भावनिक आणि खट्याळ क्षणही पाहायला मिळणार आहेत.
पाडव्याच्या निमित्ताने वेदांतच्या प्रोत्साहनामुळे राधिका पहिल्यांदाच सर्वांसमोर बासरी वाजवणार आहे. दुसरीकडे, गोदाक्का राधिकाच्या लग्नाची तयारी आणि जुळवाजुळव करण्यास सुरुवात करते. त्यामुळे राधिकाच्या आयुष्यात आता कोणते नवे आव्हान येणार, हे पाहणे रंजक ठरेल.
‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये आई-मुलींचा भावनिक क्षण
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत कृष्णाई घरी परतल्यानंतर तिला लक्ष्मीपूजन करण्याचा आग्रह केला जातो. पूजेदरम्यान अशक्तपणामुळे तिचे हात थरथरू लागतात. तेव्हा शंकर आणि गौरी तिचे हात घट्ट धरून तिला आधार देतात.
दुसरीकडे, फराळ घेऊन गौरीला मातोश्रींच्या घरी पाठवले जाते. जिगीषाच्या सांगण्यावरून गौरीच्या पायांचे ठसे मातोश्रींच्या घरात उमटतात. भाऊबीजेच्या निमित्ताने इंदुराणी आपल्या पतीला कृष्णाईच्या दारात घेऊन येते आणि त्याचे औक्षण करते. यावेळी तिन्ही मुली आपल्या आईला पदव्या आणि आयुष्यात मिळवलेल्या यशाच्या रूपात अनोखी ओवाळणी देतात. आई आणि मुलींच्या नात्यातील हा भावनिक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘कमळी’मध्ये ऋषी-कमळीच्या जवळिकीमुळे नयनताराला धक्का
‘कमळी’ मालिकेत अन्नपूर्णा आजी घरात फॅमिली बोर्ड मीटिंग बोलावते. त्यामुळे घरातील वातावरणात उत्सुकतेसोबतच तणावही निर्माण होतो. दुसरीकडे, ऋषी बंडखोर वृत्तीने कमळीसोबत आपल्या कॉलेजच्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात करतो. या निमित्ताने दोघांमधील जवळीक वाढू लागते.
मात्र, ऋषी आणि कमळीला एकत्र पाहून नयनताराला मोठा धक्का बसतो. तिच्या मनात नाराजी आणि गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे आता ऋषी, कमळी आणि नयनतारा यांच्या आयुष्यात कोणते नवे भावनिक वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘तारिणी’ मालिकेत भाऊबीजेच्या निमित्ताने एक मोठी घटना घडते. युवराज कौशिकीचा अपमान करतो. मात्र, केदारला हे सहन होत नाही आणि तो युवराजच्या कानाखाली लगावतो. दिवाळीनंतर कव्याच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच तारिणीसमोर एक नवे आव्हान उभे राहते.
शाळेच्या बसमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्याची महत्त्वाची जबाबदारी तारिणीवर सोपवली जाते. दुसरीकडे, आता सीईओ झालेला दयानंद याच्या परवानगीने युवराज या घटनेचे अतिरंजित वार्तांकन करतो. त्यामुळे या प्रकरणात तारिणीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार आणि ती मुलांची सुखरूप सुटका कशी करणार, हे पाहणे थरारक ठरणार आहे.
एकूणच, झी मराठीवरील प्रत्येक मालिकेत या आठवड्यात नवे ट्विस्ट, भावनिक क्षण आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुढे काय घडणार, याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, आपल्या आवडत्या मालिका फक्त झी मराठीवर!