( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Rajiv Thakur Father Death: कॉमेडियन आणि अभिनेता राजीव ठाकूर यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजीव ठाकूर यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक याने एका व्हिडिओद्वारे या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. वडिलांच्या निधनामुळे राजीव ठाकूर इंदूरमधील नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
कृष्णा अभिषेक इंदूरमधील एका कार्यक्रमात राजीव ठाकूरसोबत परफॉर्म करणार होता. मात्र, कार्यक्रमाच्या काही वेळ आधी राजीव यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली.
कार्यक्रमासाठी इंदूरला पोहोचल्यानंतर कृष्णा अभिषेकने आयोजकासोबत एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्याने राजीव ठाकूर यांच्या वडिलांच्या निधनामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले.
कृष्णाने सांगितले की, “आम्ही इंदूरला निघणार होतो, तेव्हाच आम्हाला कळले की राजीव ठाकूर यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. ही आमच्यासाठी खूप दुःखद बातमी आहे.” त्यामुळे तिकीट बुक केलेल्या प्रेक्षकांनी परिस्थिती समजून घ्यावी, अशी विनंतीही त्याने केली.
View this post on Instagram
कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्यामुळे आयोजकांनी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. कार्यक्रमासाठी तिकीट बुक केलेल्या प्रत्येकाला पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नवीन तारीख लवकरच जाहीर करून कार्यक्रम पुन्हा आयोजित केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
राजीव ठाकूर यांनी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावण्यापूर्वी पंजाबी रंगभूमीवर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमांमधून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
यानंतर ते ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसले. या शोमध्ये त्यांनी विविध सहाय्यक भूमिका आणि स्केच कॅरेक्टर्स साकारले. त्यातील ‘राजू’ ही व्यक्तिरेखा विशेष लोकप्रिय ठरली.
गरिबीच्या दिवसांचीही केली होती आठवण
काही काळापूर्वी राजीव ठाकूर एका मुलाखतीमुळे चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी होती, याबद्दल भाष्य केले होते.
राजीव यांनी सांगितले होते की, त्यांचे कुटुंब एका छोट्या घरात राहत होते. घरात केवळ एकच बाथरूम असल्यामुळे कुटुंबातील एखादी व्यक्ती अंघोळ करत असेल, तर इतरांना बाहेर थांबावे लागत असे. आपल्या जुन्या आठवणी सांगताना ते भावूक झाले होते.
आता वडिलांच्या निधनाच्या बातमीने राजीव ठाकूर यांच्या चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून, सोशल मीडियावर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.






