सौजन्य - सोशल मिडीया
नांदर येथील सोमनाथ रोडगे याने श्याम आणि आयुष या दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही चिमुकल्यांचा शोध सुरू होता. आयुष ऊर्फ आर्यन सोमनाथ रोडगे (वय ७) याचा मृतदेह बुधवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजता कालव्यात सापडला होता. त्याच दिवशी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यानंतर पोलिसांचे पथक श्यामचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी रामनगर, नवगाव १० नंबर चारीजवळ टाकळी पुलाशेजारी श्यामचा मृतदेह आढळला. पाचोड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात श्यामवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून, घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही गावातील अनेक घरांमध्ये चूल पेटली नसल्याचे सांगण्यात आले.
कौटुंबिक वादातून प्रकार?
सोमनाथ रोडगे आणि त्याची पत्नी यांच्यात मुलांच्या संगोपनावरून तसेच अन्य कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची चर्चा आहे. या वादातूनच त्याने दोन्ही मुलांना संपविल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. मुलांचे मृतदेह सापडू नयेत म्हणून त्यांना कालव्यात फेकल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पत्नीचाही जीव घेण्याचा विचार होता; मात्र ती सोबत न आल्याने तिचा जीव वाचल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र, आरोपीने सांगितलेले कारण पोलिसांना पूर्णपणे पटलेले नसून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत.
हे सुद्धा वाचा : स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई
आईच्या तक्रारीवरून गुन्हा
या प्रकरणी आई सुषमा रोडगे (वय २७) यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री सोमनाथ ऊर्फ परमेश्वर रोडगे (वय ४०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पिता घटनेच्या पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास पाचोड पोलिस करीत आहेत.
Ans: पाच वर्षीय श्यामचा मृतदेह गुरुवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता विहामांडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथे टाकळी पुलाजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात आढळला.
Ans: श्यामचा सात वर्षीय भाऊ आयुष ऊर्फ आर्यन याचाही मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवारी (दि. १८) सकाळी कालव्यात सापडला होता.
Ans: आई सुषमा रोडगे यांच्या तक्रारीवरून सोमनाथ ऊर्फ परमेश्वर रोडगे (वय ४०) याच्याविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.






