पाकिस्तानमध्ये मशिदीत नमाज पठणावेळी बॉम्बस्फोट; आत्मघाती हल्ल्याचा संशय
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी दुपारी नमाज पठणावेळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रांतातील नौशेरा भागात एका मशिदीमध्ये हा स्फोट झाला. नमाज पाठणासाठी मोठ्या संख्येनं लोक या मशिदीमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. सुसाईड बॉम्बरकरही हा आत्मघाती स्फोट घडवून आणल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक पोलीस प्रशासनाने मशिदीच्या आसपासच्या भागाची नाकेबंदी केली. बचावपथकाचे प्रमुख बिलाल फैझी यांनी किमान २० नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
मशिदीच्या मुख्य सभागृहात नमाज पठण चालू असताना हा बॉम्बस्फोट झाला. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नौशेरा भागात संचारबंदी लागू केली आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचंच दिसून येत असून सविस्तर तपास केला जात आहे, अशी माहिती खैबर पख्तुनख्वाचे पोलीस प्रमुख झुल्फिकार हमीद यांनी दिली.सदर मदरसा मु्लीम अभ्यासक मौलाना अब्दुल हक हक्कानी यांनी सप्टेंबर १९४७मध्ये स्थापन केला होता. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्या प्रकरणात सदर मदरशाच्या तीन विद्यार्थ्यांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, मदरसा प्रशासनाने सातत्याने हे आरोप खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.