झारखंडात सापडले पैशांचे घबाड, अफू निवडणुकीत वापर होण्याची होती शक्यता
कोडरमा : महाराष्ट्रासह झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यात झारखंड विधानसभा निवडणुकीच्या नामांकनादरम्यान कोडरमा येथे पोलिसांनी छापला. या छापेमारीच्या कारवाईत कोट्यवधींचे घबाड सापडले. त्यात अफू आणि इतर साहित्यही पोलिसांना मिळून आले. यातील नोटांची संख्या इतकी होती की ती मोजण्यासाठी मशिन बोलावावे लागले.
कोडरमाचे पोलिस अधीक्षक यांना एक गुप्त माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. कोडरमा पोलीस ठाण्याच्या वृंदा गावात राहणाऱ्या सुखदेव रजक यांच्या घरात काहीतरी असामान्य असल्याची माहिती एसपींना मिळाली होती.
यानंतर एसपींनी एक टीम तयार करून छापेमारी सुरू केली. पथकाने छापा टाकला असता त्या घरात मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल सापडले. या कारवाईत पोलिसांना अफू आणि इतर साहित्यही आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान याचा वापर होणार होता, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांची करडी नजर
झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष दाखवण्यासह इतर गैरकृत्यामध्ये नशेली पदार्थांचा सर्रास वापर होतो, त्यामुळे अशा हालचालींवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. त्यातच झारखंडमधून अफू आणि कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत.