
इराण-अमेरिका युद्धाचा सर्वसामान्यांवर होतोय परिणाम; इंधनाच्या दरानंतर आता खाद्यतेलाचे दरही वाढले
नवी दिल्ली : जागतिक तणावाचा परिणाम आता खाद्यतेलाच्या किमतींवर जाणवत आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या पाठोपाठ, मोहरीच्या तेलासह इतर खाद्यतेलांच्या किमतीही वाढल्या आहेत. वाढत्या किमतींचा परिणाम गृहिणींच्या खर्चावर होत आहे. आता तेलाच्या किमती वाढताना दिसत आहे. मोहरीचे तेल जे पूर्वी १७५ रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते, ते आता १८५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती १५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती सातत्याने नवे उच्चांक गाठत आहेत. तेल व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत १५ किलोच्या खाद्यतेलाच्या डब्यावर ३०० ते ३५० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होत असून, प्रति दरात २० ते २२ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
बाजारातील तेजी थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून गेल्या दोन-तीन दिवसांतच प्रति टिन ६० ते ७० रुपयांची अतिरिक्त वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त करत पुढील काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. नागपूरमधील तेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ५६ टक्के सोयाबीन तेल अमेरिकेतून आयात करतो. सध्या ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’चा मार्ग बंद असल्याने अमेरिकेतून येणारा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
याशिवाय देशात मोठ्या प्रमाणात येणारे सूर्यफूल तेल रशिया आणि युक्रेनमधून येते. मात्र, युद्धामुळे तो मार्गही पूर्णपणे बंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पाम तेलाचा मोठा हिस्सा बायोडिझेल निर्मितीकडे वळवला जात आहे. त्यामुळे खाद्यतेलाची आवक घटली असून, जागतिक संकटाचा थेट परिणाम बाजारावर होत आहे.
हॉटेल व्यवसायात पाम तेलाला मागणी
नागपूरसह संपूर्ण विदर्भातील घरगुती ग्राहकांमध्ये सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी आहे. तर हॉटेल, केटरिंग आणि फरसाण उद्योगात पाम तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या दरात प्रति टिन केवळ ५० रुपयांचा फरक आहे. पाम तेल फार स्वस्त नसले तरी त्याचा टिकाऊपणा अधिक असल्याने तळलेले पदार्थ अधिक काळ टिकतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून पाम तेलाला प्राधान्य दिले जाते.
तेल आणखी १५० रुपयांपर्यंत महागण्याची शक्यता
येत्या एक-दोन दिवसांत सरकार खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवू शकते. परकीय चलनाची बचत करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान यांनीही खाद्यतेलाचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले होते. जर सरकारने आयात शुल्क वाढवले, तर स्थानिक बाजारातही खाद्यतेलाच्या दरात प्रति टिन १०० ते १५० रुपयांची आणखी वाढ होऊ शकते.
वाहतूक खर्चात वाढ; खाद्यतेलांच्या किमतीही वाढणार
वाहतूक खर्चात झालेल्या वाढीचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतींवर झाला आहे. रिफाइंड तेल १३० रुपयांवरून १७५ रुपये प्रति लिटर आणि तिळाचे तेल १५० रुपयांवरून १६५ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. वाढत्या खर्चामुळे बाजारातील किमतींवर दबाव येत आहे. त्याचा परिणाम महागाईत दिसून येत आहे.