
Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये पुन्हा तणाव; अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्याने हादरले इराण, होर्मुझमधील जहाजावर...
वॉशिंग्टन : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेल्याचे दिसून आले आहे. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. त्यातच अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) नवीन हल्ल्याची माहिती दिली. अमेरिकी सैन्याने (ईटी) इराणवर नवीन हल्ले केल्याचे सांगितले. या आठवड्यात इराणवरील हल्ल्यांची ही तिसरी वेळ आहे. हे हल्ले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केले जात आहेत.
सेंटकॉमच्या म्हणण्यानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) एका व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या सायप्रस-ध्वजांकित कंटेनर जहाज ‘एम/व्ही जीएफएस गॅलेक्सी’वर हल्ला केला. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, सेंटकॉमने म्हटले आहे की, हल्ल्यानंतर जहाजावरील एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागल्याने आणि जहाजाच्या इंजिन रूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जहाजाला आपला प्रवास पुढे चालू ठेवण्यास अडचणी येत आहेत.
At 7:15 p.m. ET today, U.S. Central Command forces began launching the third round of strikes this week against Iran after Islamic Revolutionary Guard Corps forces blatantly attacked M/V GFS Galaxy, a Cyprus-flagged container ship transiting the Strait of Hormuz. A civilian crew… — U.S. Central Command (@CENTCOM) July 11, 2026
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, इराणच्या अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, केशम बेटावर स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनी, आयआरआयबीने (IRIB) सुद्धा बंदर अब्बासमध्ये तीन आणि सिरिकमध्ये दोन स्फोट झाल्याचे वृत्त दिले.
कराराचे पालन करण्यात इराण अपयशी
अमेरिकेच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, व्यापारी जहाजांवरील पूर्वीच्या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरण्यात आले होते. यानंतर, सामंजस्य कराराचे पालन करण्यासाठी इराणला आणखी एक संधी देण्यात आली. परंतु ते पुन्हा अपयशी ठरले. याला प्रत्युत्तर म्हणून, अमेरिका इराणवर मोठी आर्थिक कारवाई करत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मुक्तपणे जाणाऱ्या नागरी खलाशांवर आणि व्यापारी जहाजांवर हल्ला करण्याची इराणची क्षमता नष्ट करणे, हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.
इराणचा अणुबॉम्ब विकसित करण्याचा नाही इरादा
इराणचा कोणताही अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब विकसित करण्याचा इरादा नाही आणि गरज पडल्यास देश या गोष्टीची लेखी पुष्टी देण्यासही तयार आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी अमेरिकेसह संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले की, युरेनियम संवर्धनाचा (Uranium Enrichment) आपला हक्क इराण कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही आणि समोरील देशांना हा अधिकार मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले.