एअर इंडिया विमान अपघातात खळबळजनक दावा(फोटो सौजन्य-X)
Air India Plane Crash in Marathi: गेल्या आठवड्यात (12 जून) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. या अपघातात किमान २७० जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या एका आठवड्यानंतर एक खळबळजनक दावा समोर आला आहे. एअर इंडियाच्या दोन वरिष्ठ विमान परिचारिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, अहमदाबाद अपघाताच्या एक वर्ष आधी बोईंग ७८७ ड्रीमलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दोघांनीही एअरलाइनला दिली होती.
टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार दोन्ही परिचारिकांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, एअरलाइनने केवळ त्यांच्या चिंता फेटाळल्या नाहीत तर त्यांना त्यांचे विधान बदलण्यास सांगितले. त्यांचे विधान बदलण्यास नकार दिल्याबद्दल एअरलाइनने त्यांना काढून टाकण्यात आले,अशी माहिती समोर येत आहे.
या संदर्भात दोन्ही कर्मचाऱ्यांनी आरोप केला की, त्यांनी ड्रीमलाइनरचा दरवाजा सदोष असल्याचे सांगितले होते, असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार १४ मे २०२४ रोजी, मुंबई-लंडन B787 (VT-ANQ) ऑपरेटिंग फ्लाइट AI-129 हीथ्रो येथे डॉक करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. पत्रात म्हटले आहे की, दरवाजा उघडण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन फ्लाइट अटेंडंटनी ते मॅन्युअल स्थितीत असल्याची पुष्टी करण्यासाठी चेकलिस्ट केली. परंतु दरवाजा उघडताच स्लाइड राफ्ट तैनात झाला, असं एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे.
तसेच २०२० च्या विमान अपघातात इंजिनमध्ये बिघाड होण्याचे कारण इंधन प्रणालीतील समस्या होती, तर अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत असे दिसून आले आहे की विमानात वीज बिघाड किंवा विद्युत बिघाड होता. अहमदाबादमधील हा विमान अपघात मेघनी नगर परिसरात घडला. विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. अनेक मृतदेह गंभीरपणे जळाले होते आणि त्यांची ओळख पटू शकली नाही, त्यामुळे अपघातानंतर मृतांच्या डीएनए चाचण्याही घेण्यात आल्या. विमानात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी फक्त एकच व्यक्ती वाचला.
विमान अपघाताच्या तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाच्या मुख्य विद्युत यंत्रणेत वीज खंडित झाली. घटनास्थळावरून मिळालेले सर्व पुरावे, विमानाचा ढिगारा आणि टेक-ऑफ अपघाताचा व्हिडिओ यावरून विजेमध्ये काही समस्या असल्याचे स्पष्ट होते आणि ब्लॅक बॉक्स डेटा मिळाल्यानंतर याचे कारण कळेल.