मदरशांबाबत योगी आदित्यनाथ यांचा कारवाईचा निर्णय
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे तडखाफडखीचे निर्णय आणि बुलडोझर कारवाई याची चर्चा देशभरामध्ये चालू असते. उत्तर प्रदेशात सुरू असलेले मदरसे पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगींच्या रडारवर आले आहेत. नोंदणी नसलेल्या मदरशांची यादी अधिकाऱ्यांना बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादी बनवण्यास अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून अलीगडमधील मदरशांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
अलिगडमधील मदरशांवर गदा
अलिगड जिल्ह्यातील जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांच्या अहवालात 94 मदरसे बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे आढळून आले आहे. या मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्या प्राथमिक शाळांमध्ये हलवण्यात येणार आहे. मुले स्थलांतरित होताच या बेकायदेशीर मदरशांना लवकरच टाळे ठोकण्यात येणार आहे. याबाबत योगी सरकारने निर्णय घेतला आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी निधी गोस्वामी यांनी सांगितले की, सर्वेक्षणात जिल्ह्यातील एकूण 94 मदरसे नोंदणीकृत नसल्याचे समोर आले आहे. त्यांना कोणत्याही मंडळाकडून किंवा इतर कोणत्याही प्रकारची मान्यता मिळालेली नाही. त्यांनी सांगितले की, या बेकायदेशीर मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना जवळच्या मूलभूत शिक्षणाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर सरकारच्या सूचनेनुसार हे मदरसे बंद करण्यात येणार आहेत.
सीएम आदित्नाथ योगी यांनी 2022 सालापासून उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनाकडून सूचना मिळताच अधिकाऱ्यांनी मदरशांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी मान्यताप्राप्त आणि अनोळखी मदरशांना भेटी देऊन सर्वेक्षण केले आणि या मदरशांना निधी कोठून मिळतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या मदरशात किती मुले शिकत आहेत? ते अधिकृत आहेत का याबाबत चौकशी सुरु ठेवली आहे.