गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील जमीन बळकावण्याच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या लोकांना कडक इशारा दिला असून, त्यात भाजपचे नेतेही सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांना सोडले जाणार नाही. भूमाफियांना भाजप किंवा काँग्रेसच्या श्रेणीत टाकता येणार नाही. ते गुन्हेगार आहेत, कुणालाही सोडले जाणार नाही, मग ते भाजप असो वा काँग्रेस, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या कारवाईमुळे भूमाफियांच्या एका गटाने बेकायदेशीर मार्गाने ताब्यात घेतलेल्या जमिनी यापूर्वीच रिकामी केल्याचा दावा त्यांनी केला. जमिनीच्या मूळ मालकांनाही त्यांची मालमत्ता परत मिळाली. जिल्हा आयुक्त आणि पोलीस या संपूर्ण संगनमताचा पर्दाफाश करण्याचे काम करत आहेत. यापूर्वी गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितले की, गुवाहाटीमध्ये जमीन बळकावण्याचे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. भूमाफिया सरकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करत असावेत. या संगनमतामध्ये काही वकिलांचाही सहभाग असू शकतो.
गेल्या आठवड्यात गुवाहाटीमध्ये जमीन बळकावण्याच्या घटनांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली किमान तीन जणांना अटक करण्यात आली होती. भाजप ओबीसी मोर्चाचे नेते पंकज दास हेही जमीन बळकावण्याच्या प्रकरणात अडकले होते. नंतर त्यांना पक्षाच्या पदावरून हटवण्यात आले.