हरवलेली मुलगी, बॅगेत मृतदेह अन् २४०० किमी प्रवास...; असं उलगडलं अंगावर शहारे आणणाऱ्या खूनाचं गूढ
बेंगळुरूच्या चंदापूरा परिसरातील एका रेल्वे ब्रिजखाली आढळलेल्या ट्रॉली बॅगमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मृतदेह ओळखण्याजोगा होता, मात्र तिची कोणतीही ओळख पटत नव्हती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चेहऱ्याच्या फोटोमुळे अखेर 17 वर्षीय रिया बिहारच्या नवादा जिल्ह्यातील हिसुआ गावात राहणारी असल्याचे उघड झालं. एका चित्रपटाच्या कथानकाप्रमाने थरारक ही घटना असून मृतदेहासोबत 2400 किलोमीटरचा प्रवास करण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण देशाला हादरवून टाकणारं हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया…
21 मे रोजी सकाळी बेंगळुरूच्या चंदापूरा रेल्वे ब्रिजखाली एक निळ्या रंगाची ट्रॉली बॅग आढळली. एक कचरा वेचक त्या बॅगेकडे आकर्षित झाला, आणि आत काही मौल्यवान वस्तू असल्याच्या अपेक्षेने त्याने बॅग उघडायचा प्रयत्न केला. बॅग उघडता न आल्याने त्याने ती कापली आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. बॅगमध्ये मृतदेह होता. त्याने तिथून पळ काढला आणि याची माहिती पोलिसांना दिली. सूर्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. बॅगेत कोणतीही ओळख पटवणारी वस्तू नव्हती, पण चेहरा साफ असल्यामुळे सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करण्यात आला.
दरम्यान, बिहारच्या नवादा जिल्ह्यातील हिसुआ गावातून 15 मे रोजी रिया नावाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता आणि संशय आशिक कुमार नावाच्या युवकावर व्यक्त केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मृतदेहाचा फोटो पाहून स्थानिक पोलिसांनी आणि रियाच्या कुटुंबीयांनी ओळख पटवली.त्यानंतर रियाचे वडील बेंगळुरूला जाऊन मृतदेहाची शहानिशा केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, रियाचा गळा दाबून खून करण्यात आला होता आणि तिची मानदेखील मोडलेली होती.
रिया बेपत्ता झाल्यापासून तिच्या वडिलांनी आशिक कुमारवर संशय व्यक्त केला होता. आशिक आधीपासूनच विवाहित असून त्याची पत्नी आणि मूल नवादामध्ये राहतात. तो बेंगळुरूमध्ये नोकरी करत होता. रियाला फूस लावून तो तिला बेंगळुरूला घेऊन गेला. 15 मे रोजी दोघेही गयामार्गे कोलकाता आणि तेथून बेंगळुरूला पोहोचले. ते फूफाच्या घरी एकत्र राहत होते. दरम्यान 20 मे रोजी, फूफा आणि फूफी ड्युटीला गेले असताना, घरात आशिक आणि रिया यांच्यात वाद झाला. संतापात आशिकने रियाचा गळा दाबून खून केला. मृतदेह पाहून तो घाबरला आणि काही मित्रांना घरी बोलावले. त्यांना आत्महत्येचे नाट्य सादर करायला सांगितले. खिडकीचा काचा आतून फोडून त्यांनी चुकीचा पुरावा तयार केला.
Mumbai Drugs News: मुंबई विमानतळावर ५१ कोटी ९४ लाखांचे कोकेन जप्त; परदेशी नागरिक अटकेत
फूफाने सल्ला दिला की मृतदेह कुठे तरी लपवावा. त्यानंतर मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून, ऑनलाइन कॅब बुक करून, चंदापूरा रेल्वे ब्रिजच्या खाली तो बॅग फेकण्यात आली. कॅब चालकाला संशय आला, पण त्याने पोलिसांना काही सांगितले नाही.मात्र, पोलिस तपासाने सर्व सुत्रं एकत्र जुळवत खुनाच्या रहस्याचा उलगडा केला. नवादा आणि बेंगळुरू पोलिसांनी संयुक्त कारवाईत आशिकसह त्याचे फूफा-फूफी आणि सहा मित्रांना अटक केली.