
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा समावेश आहे. व्हॉट्सऍपचा (WhatsApp) वापर करताना आता काळजी घ्यावी लागणार आहे. कारण तो एक फोन कॉल (WhatsApp International Call) तुम्हाला चांगलेच अडचणीत आणू शकतो. त्यातून तुमचं बँक अकाउंटच रिकामं होऊ शकतं. त्यामुळे त्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
जर तुम्हाला +212, +84, +62, +60 सारख्या आंतरराष्ट्रीय कोडवरून व्हॉट्सअॅप कॉल आला असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही. फक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप यूजर्सना अचानक असे कॉल येत आहेत. अनेक लोक दररोज ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियावर अशा कॉल्सबद्दल त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. त्यानुसार, आता गृह मंत्रालयाच्या I4C (इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर) ने व्हॉट्सअॅप युजर्ससाठी सतर्कतेसाठी एक व्हिडिओ जारी केला आहे.
व्हॉट्सअॅप कॉलच्या मागे आंतरराष्ट्रीय स्कॅमर
व्हॉट्सअॅप कॉल्समागे आंतरराष्ट्रीय स्कॅमर्सचा हात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ते मालवेअरसारखे धोकादायक व्हायरस ट्रान्सफर करत आहेत. काही वेळा कॉल ब्लँक असतात. अनेकवेळा व्हॉट्सअॅपवर अशाच कॉलद्वारे लिंक पाठवल्या जात आहेत. त्या लिंकवर क्लिक करणे धोकादायक आहे.
तक्रार नोंदवण्यास करू नका उशीर
सध्या केवळ दिल्ली पोलीसच नाही तर विविध राज्यांच्या पोलिसांनाही परदेशी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांचा हेतू काय आहे? याचा तपास आता सायबर सुरक्षा एजन्सी करत आहे. जर तुम्ही चुकून कॉल उचलला असेल आणि फसवणुकीला बळी पडला असेल, तर उशीर न करता सायबर सेलकडे तुमची तक्रार नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फक्त नंबर ब्लॉक करू नका तर…
कॉल डिस्कनेक्ट करा आणि ब्लॉक आणि रिपोर्ट पर्यायावर क्लिक करा. तुम्हालाही मेसेज येत असतील तर यामध्ये पहिला मेसेज येताच, चॅट-स्क्रीनवर दर्शविलेल्या नंबरवर क्लिक करा. Media, Links किंवा Mute असे अनेक पर्याय दिसतील. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ब्लॉक आणि रिपोर्टचा पर्याय दिसेल. फक्त नंबर ब्लॉक करू नका, तसेच तक्रार करा. रिपोर्ट अँड ब्लॉक करा.