Bhushan Gavai Mother Kamalabai Gavai reaction on attack on Chief Justice in supreme court
Kamalabai Gavai : नवी दिल्ली : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलांना बाहेर काढले. या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा सुरु असून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या मातोश्री कमलाबाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या जोरदार निषेध करण्यात येत आहे. त्यांच्या बहिणीने देखील संताप व्यक्त केला. यानंतर त्यांच्या आई कमलाताई गवई यांनी याविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या या तत्त्वावर आधारित आहे. कोणालाही कायद्याच्या बाहेर जाऊन अराजकता पसरवण्याचा अधिकार नाही. कृपया आपले प्रश्न आपण शांततेने आणि संवैधानिक मार्गाने सोडवून घ्यावेत अशी मी सर्वांना विनंती करते,” असे कमलबाई गवई म्हणाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांची बहिण कीर्ती गवई यांनी देखील निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, “कालची घटना देशावर कलंक असलेली आणि अतिशय निंदनीय आहे. हा केवळ एक वैयक्तिक हल्ला नाही, तर एक विषारी विचारसरणी आहे. याला रोखणे आवश्यक आहे. असंवैधानिक वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.. बाबासाहेबांच्या विचारांना धक्का पोहोचू नये म्हणून आपण आपला निषेध संवैधानिक पातळीवर आणि शांततापूर्ण पद्धतीने नोंदवला पाहिजे.” अशा शब्दांत किर्ती भूषण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरन्यायाधीशावर हल्ला करणारे वकील राकेश किशोर म्हणाले की, ‘सनातन धर्माशी संबंधित प्रकरणे उद्भवल्यास सर्वोच्च न्यायालय असेच आदेश जारी करते. मला माझ्या कृत्याबाबत कोणताही खेद नाही. मी मद्यधुंद नव्हतो. त्यांच्या ‘अॅक्शनवर माझी रिअॅक्शन’ होती. मला माझ्या कृतीची भीती किंवा पश्चात्ताप नाही. 16 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांच्या न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. सरन्यायाधीशांनी मूर्तीसमोर प्रार्थना करा, असे त्यांनी म्हटले होते. सरन्यायाधीश हे धर्माच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे रेल्वे जमिनीवर विशेष समुदायाचा कब्जा आहे. जेव्हा ते हटवण्याची मागणी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मागील तीन वर्षांपूर्वी ही स्थगिती देण्यात आली होती. अद्यापही स्थगिती कायम आहे. आमच्या सनातन धर्माविषयी विषय येतो तेव्हा जलीकट्टू असो दहीहंडी असो कोणताही छोटा-मोठा मुद्दा असो त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालय घेते. मात्र, न्यायालयाने असे करायला नको होते. यामुळेच मी दु:खी आहे. व्यक्तीला दिलासा द्या किंवा देऊ नका. मात्र, त्याची चेष्टा करू नका. मीदेखील हिंसेच्या विरोधात आहे. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा नाही. ना कोणासोबतही संबंध नाहीत. पण, मला माझ्या कृत्यावर खेद नाही.
संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया राकेश किशोर यांनी दिली आहे.