
बिहार निवडणुकांसाठी भाजपचे दबाव यंत्र? ‘राजद’ चे छपराचे उमेदवार खेसारीलाल यादव यांच्या घराला पालिकेची नोटीस
छपरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले खेसारीलाल यादव हे बिहारमध्ये मतदारांमध्ये लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांची लढत भाजप उमेदवाराशी थेट होणार आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीत मोठं नाव असलेले खेसारीलाल आता राजकारणाच्या मैदानात उतरल्याने बिहार निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे.
महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ०४ कडून ३ नोव्हेंबर रोजी जारी झालेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की,“रो हाऊस क्र. १ आणि २ मध्ये तळमजला, पहिला मजला व दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी अँगल आणि पत्र्याच्या सहाय्याने शेडचे बांधकाम मंजूर नकाशाशिवाय करण्यात आले असून, ते अनधिकृत ठरविण्यात येते.” महापालिकेने यादव यांना हे बांधकाम तातडीने काढून घेण्याचे निर्देश दिले असून, अन्यथा अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करून बांधकाम पाडले जाईल आणि खर्च मालकाकडून वसूल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या यादव कुटुंब बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारात असल्यामुळे मिरा रोड येथील घर बंद आहे. त्यामुळे कारवाईचा उद्देश नेमका काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, “इतक्या काळापासून बांधकाम सुरू असताना निवडणुकीच्या तोंडावरच नोटीस का? हा योगायोग आहे का राजकीय दबाव?”
राजकीय निरीक्षकांच्या मते, “निवडणुकीच्या काळात विरोधी उमेदवारांवर अशा प्रशासकीय कारवाया करण्यात येणे हे ‘राजकीय दबाव तंत्र’ म्हणून पाहिले जाते. या घटनेमुळे बिहारपुरतेच नव्हे तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.”
सध्या खेसारीलाल यादव यांच्या घराला कुलूप असून, पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष तपासणी केल्याची माहिती मिळाली आहे. निवडणूक प्रचार शिगेला असताना या कारवाईमुळे बिहार व महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत मिरा रोड परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई झाल्यास ही घटना आणखी गाजण्याची शक्यता आहे. बिहारच्या रणधुमाळीत सुरू असलेल्या या घटनेमुळे मिरा रोडपासून छपरा पर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. खेसारीलाल यादव यांच्या घरावरील नोटीस ही केवळ प्रशासकीय कारवाई आहे की राजकीय दबावाची झलक, हे आगामी घडामोडींवरून स्पष्ट होईल.