Shivsena News: शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत...?
Shivsena News: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून राजकीय संन्यास घेण्याचा विचार जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत अनेकदा ” आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत.” असं म्हणत आपले विचार उघडपणे जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलून दाखवले आहेत. राज्यात महायुतीची सत्ता असतानाही राज्याचे सामाजिक न्याय मंत्री पद असताना संजय शिरसाट यांना राजकीय संन्यास घेण्याचा विचार का करत आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. अशातच कालच्या नांदेड दौऱ्यावर असताना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य केलं आहे.
नांदेड दौऱ्यावर असताना संजय शिरसाट यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, शिरसाट म्हणाले की,’ मला निश्चितच थांबायचं आहे. पण निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक असल्याने आताच त्याचा विचार कशाला करायचा,’ अस म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करण मात्र टाळलं आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच संजय शिरसाट यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांचे भावी महापौर असा उल्लेख असलेले बॅनर्सही झळकू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांमध्ये चलबिचल वाढली आहे. त्यातच इतर माजी महापौर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजीचा सूरही होता.
याशिवाय त्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यादेखील राजकारणात सक्रीय होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची राजकीय इच्छाशक्ती पाहता शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचा विचार करत आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंबातील मुलांचा राजकीय प्रवास अधिक सुकर व्हावा आणि त्यांना संधी मिळावी म्हणून शिरसाट राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याच बोलले जात आहे.
संजय शिरसाट यांचा महापालिकेतील नगरसेवक पदापासून राजकीय प्रवास हा सुरू झाला तो आज राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. सलग तीन कार्यकाळ आमदार आणि सध्या मंत्री असलेले संजय शिरसाट यांना अलीकडच्या काळात “आता थांबावे” असे वाटू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या या भावनेमागे कुटुंबातील पुढील पिढीला म्हणजे मुलाला आणि मुलीला राजकारणात स्थान मिळावे, हे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
Maharashtra Politics: “… तुम्हाला उडवून देऊ”; कॉँग्रेस खासदाराची मोदी-फडणवीसांना धमकी; राज्यात खळबळ
सिद्धांत शिरसाट यांनी मात्र या बॅनरबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले. “महापौरपदाबाबतचा निर्णय आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,” असे सांगत माजी महापौर आणि इच्छुकांनी परिस्थिती संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट यांच्या संभाव्य राजकीय निवृत्तीच्या चर्चांमुळे आणि त्यांच्या कुटुंबातील दुसरी पिढी सक्रिय होण्याच्या हालचालींमुळे शिवसेनेत (शिंदे गट) वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये काहीसे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.






