दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजप (BJP) आणि संघाच्या संबंधांवर (RSS) मोठं विधान केलं आहे. भाजप आणि संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाही, असं ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारांशी संघाचा समन्वय असतो. एखाद्या विषयावर संघ फक्त सल्ला देऊ शकतो, निर्णय भाजपचा असतो. “जर आम्ही निर्णय घेतला असता, तर एवढा वेळ लागला असता का?” असा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या काही काळापासून संघ आणि भाजपमध्ये तणाव असल्याच्या अटकळा सुरू होत्या.
संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले, “मी शाखा चालवण्यात कुशल आहे, तर भाजप सरकार चालवण्यात कुशल आहे. आम्ही फक्त एकमेकांना सूचना देऊ शकतो.” भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीतील विलंबामुळे आरएसएस प्रमुख भागवत यांनी टोमणा मारला, “तुम्ही तुमचा वेळ घ्या, आम्हाला काहीही सांगण्याची गरज नाहीये.”
#WATCH | Delhi: RSS chief Mohan Bhagwat says, “Humare yahan mat bhed ho sakta hai par mann bhed nahi hai…Does RSS decide everything? This is completely wrong. This cannot happen at all. I have been running the Sangh for many years, and they are running the government.… pic.twitter.com/qClvA9HPFF
— ANI (@ANI) August 28, 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी मोहन भागवत म्हणाले, “कुठेही कोणतेही भांडण नाही. आमचं प्रत्येक सरकारसोबत, मग ते राज्याचं असो वा केंद्राचं, चांगलं सहकार्य आहे. पण व्यवस्थेमध्ये काही अंतर्गत विरोधाभास आहेत. मुळात, ही व्यवस्था इंग्रजांनी राज्य करण्यासाठी तयार केली होती. त्यामुळे त्यात काही बदल आणि नवे प्रयोग करण्याची गरज आहे. काही कामं व्हावी अशी आपली इच्छा असते, पण खुर्चीवर बसलेली व्यक्ती 100% आपल्यासोबत असली तरी तिला काम करावं लागतं आणि तिला माहिती असतं की मार्गात अनेक अडथळे आहेत. ती हे काम करू शकेल की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आपण त्याला ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कुठेही कोणतेही भांडण नाही.”
संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले, “१९४८ मध्ये जयप्रकाश नारायण मशाल घेऊन संघाला जाळण्यासाठी निघाले होते, पण आणीबाणीनंतर ते परत येऊन म्हणाले की, परिवर्तनाची आशा तुमच्याकडूनच आहे. प्रणव मुखर्जीही आमच्या व्यासपीठावर आले होते. आमचे स्वयंसेवक अनेक पक्षांच्या चांगल्या कामांसाठीही मदत करतात. राजीव गांधी जेव्हा एनएसयूआयचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नागपूरमधील अधिवेशनात जेवणावरून गोंधळ झाला, तेव्हा त्यांनी आमच्याकडे मदत मागितली आणि आम्ही त्यांना मदत केली.”
शिक्षण प्रणालीच्या मुद्द्यावरही मोहन भागवत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “धार्मिक श्रद्धा काहीही असोत, पण शिक्षणाच्या सामाजिक मान्यता एकच असल्या पाहिजेत. मदरशांमध्ये असो किंवा मिशनऱ्यांमध्ये, सगळीकडे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. इंग्रजीही शिकायला पाहिजे. प्रत्येक भाषेची स्वतःची एक लांब परंपरा आहे, ज्यात उत्तम साहित्य आहे. शिक्षणाचा मुख्य प्रवाह गुरुकुल पद्धतीकडे वळवला पाहिजे. याच प्रकारचं शिक्षण फिनलँडमध्ये दिलं जातं, जी जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था मानली जाते. तिथे आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं. संस्कृतचं कामचलाऊ ज्ञान भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला असलं पाहिजे. पण ते अनिवार्य करण्याची गरज नाही, नाहीतर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकते.”