नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची (Lok Sabha Elections Result 2024) उत्सुकता ताणली गेली होती. मंगळवारी मतमोजणी झाली. त्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानुसारच, आता त्यांच्याकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
लोकसभेच्या 543 जागांसाठी देशात सात टप्प्यात निवडणुका पार पडल्या. यात 4 जून रोजी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच एनडीएने आघाडी कायम ठेवली होती. मात्र, नंतर ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाढल्या. जसजसे कल हाती येत होते तसतसे भाजपची पिछाडी दिसत होती. अखेर भाजपच्या जागा कमी झाल्याने स्वबळावर त्यांना बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता मित्रपक्षांसोबत त्यांना सरकार स्थापन करावे लागणार आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळाली.
आता एनडीए आघाडीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र मोदींच्या या तिसऱ्या सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याची माहितीही दिली जात आहे. त्यानुसार, राष्ट्रपती भवनाकडून एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. या निवेदनानुसार, बुधवारी 5 जून ते 9 जून या कालावधीत राष्ट्रपती भवनाचे सर्किट-1 सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी करण्यात येणार आहे.