
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आज होणार निवृत्त; न्या. सूर्यकांत सोमवारी घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ
नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश (CJI) बी.आर. गवई आज सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त होत आहेत. त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस शुक्रवारी पार पडला. त्यानंतर आता आज ते निवृत्त होत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर सुमारे चार दशकांच्या न्यायालयीन सेवा संपत आहे. बी. आर. गवई यांच्यानंतर भारताच्या 53 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती सूर्यकांत हे असणार आहे. सोमवारी त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.
निवृत्तीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई भावनिक झाले होते. चार दशकांच्या न्यायालयीन कारकिर्दीच्या शेवटी, ते स्वतःला न्यायाचा विद्यार्थी मानत ही संस्था सोडत असल्याचे म्हटले. मी शेवटच्या वेळी या न्यायालयातून बाहेर पडत आहे तेव्हा मी देशासाठी जे काही करू शकलो ते सर्व केल्याच्या समाधानाने निघून जात आहे. वकील ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि शेवटी सरन्यायाधीश असा त्यांचा ४० वर्षांचा प्रवास अत्यंत समाधानकारक असल्याचे वर्णन केले.
हेदेखील वाचा : Supreme Court Decision: विधानसभेने पारित केलेली विधेयके राज्यपाल थांबवू शकत नाहीत, पण…; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सोमवारी (दि.२४) नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे राष्ट्रपती भवनात भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. भूतान, केनिया, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, मॉरिशस आणि ब्राझीलसह अनेक देशांचे मुख्य न्यायाधीश या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ भारतीय न्यायव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा क्षण असणार आहे.
नवे सरन्यायाधीश प्रलंबित प्रकरणांना प्राधान्य देणार
पत्रकारांशी बोलताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करण्यावर प्राथमिक लक्ष असेल. उच्च न्यायालये देखील संवैधानिक न्यायालये आहेत आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्यापूर्वी उच्च न्यायालयांमध्ये अपील करावेत हे त्यांनी भर दिला.
न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी पावले उचलणार
तसेच न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक, जलद आणि प्रभावी करण्यासाठी अनेक पावले उचलली जाणार आहेत. जुन्या प्रलंबित फायलींचे निपटारा, डिजिटल न्यायव्यवस्था आणि खंडपीठाची कार्यक्षमता हे सर्व त्यांच्या प्राधान्यांमध्ये असेल, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.